नवी मुंबईत नाट्यगृह, चित्रपटगृह, व्यायामशाळांसमोर शुकशुकाट

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद



नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र सध्या दहशतीच वातावरण पसरले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा धोका पाहता खबरदारीचे पाऊल म्हणून राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नवी मुंबईसह, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड आणि नागपूर येथील नाटयगृह, चित्रपटगृह, जिम आणि जलतरण तलाव पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनात दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला नवी मुंबईतुन चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याचे शनिवारी दिसुन आले. त्यानुसार नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या व्यायामशाळा, चित्रपटगृह, जलतरण तलाव व नाट्यगृह बंद ठेवण्यात आले असल्यामुळे नेहमी वर्दळीच्या या ठिकाणांवर शुकशुकाट पसरला होता. यामुळे शहरातील मल्टिप्लेक्स बंद असल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. नवी मुंबईतील एकमेव असलेले वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह नेहमी गजबजलेले असते. मात्र काल याठिकाणी अक्षरशः शुकशुकाट होता. राज्य सरकारच्या आदेशानुसार, शनिवारपासून नवी मुंबईतील मल्टिप्लेक्स बंद ठेवण्यात आले आहेत. कोपरखैरण्यातील बालाजी थिएटर बंद करण्यात आल्यामुळे नेहमी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होणाऱ्या याठिकाणी विकएन्ड असूनही अक्षरशः शुकशुकाट पसरला होता. घणसोली, वाशी येथील ठिकाणी हेच चित्र दिसत होते. यामुळे आमचे नुकसान झाल्याच्या भावना व्यावसायिक व्यक्त करत होते. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून सरकारने जिमही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारच्या निर्देशानंतर नवी मुंबईतील जिम बंद ठेवण्यात आल्या होत्या. यात तळवलकर्स जिम, फाल्कन जिम व इतर विविध ठिकाणच्या जिम बंद ठेवण्यात आल्या होत्या. ऐरोलीतही मोठ्या प्रमाणात व्यायामशाळा आहेत. यात से-६ येथील तळवलकर्स ही मोठी जिमही बंद ठेवण्यात आली होती. जिम्स बंद करण्याच्या सूचना मिळाल्या असून सर्वच प्रकारचा फटका सहन करावा लागत असल्याचे ऐरोलीतील फाल्कन जिमचे प्रशिक्षक अमरजित गुरंग यांनी सांगितले.