नवी मुंबई (प्रतिनिधी) - पनवेलच्या सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात अश्विनी बिंद्रे हत्याप्रकरण खटल्याची सुनावणी सुरु झाली असून काल तब्बल तीन तास अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांची उलट तपासणी (क्रॉसचीफ) चालली आणि पूर्णही झाली. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, आरोपी आणि आरोपीचे वकील प्रसाद पाटील आणि विशाल भानुशाली, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, संदीप वाघमोडे आदी हजर होते. या उलट तपासणीदरम्यान, राजू गोरे यांनी सांगलीचे तत्कालिन पोलिस अधिक्षक दिलीप सावंत यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकाना, आरोपी अभय कुरुंदकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध घनिष्ठ होते हे दर्शविणारा पाठविलेला अहवाल न्यायालयासमोर सादर केला असता, गोपनीय अहवाल आपणास कसा मिळाला? असा उलट सवाल आरोपींच्या वकिलांनी राजू गोरे यांना केला. यावर राज गोरे यांनी सदरचा अहवाल आपणास माहिती अधिकार कायदा अंतर्गत मिळाला असल्याचे नमूद केले. तसेच अश्विनी बिद्रे मुलगीचा ताबा मागत होती का? अश्या अन्य बाबींवर उलट तपासणी पुर्ण झाली. पुढील सुनावणी २७ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर हे वर्ष २०१० मध्ये २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत सांगली गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना त्यांची कार्यक्षमता चांगली नसल्याने तत्कालीन गृहमंत्र्यांच्या पसंतीनुसार त्यांची बदली तासगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी पदावर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कुरुंदकर याने तत्कालीन विरोधी पक्षनेते यांना फोन करून सदरची बदली रद्द करून घेतली होती. तसेच कुरुंदकर याची विरोधी पक्षनेते यांच्याशी जवळीक असल्याने रजेच्या कालावधीत करुंदकर त्यांना वारंवार भेटण्यास जात होते ही बाब आमच्या निदर्शनास आली असल्याचे सांगलीचे तत्कालिन पोलिस अधिक्षक दिलीप सावंत यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकाना पाठवलेल्या अहवालात नमूद करत त्यांची सांगली जिल्ह्यातून त्वरित प्रभावाने बदली करण्यात यावी अशी मागणीही केली होती. दरम्यान, यापूर्वी गत महिन्यात दि. २८ फेब्रुवारी रोजी पनवेलच्या सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज झाले होते. त्यावेळी सलग चार तास मॅरेथॉन सुनावणी चालून न्यायालयाने या खटल्यातील मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे पती राजू गोरे यांची सरतपासणी एकाच दिवसात उरकून त्यांची उलटतपासणीही सुरू केली होती. त्यावेळी या खटल्यातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची सुनावणीदरम्यान पनवेल सत्र न्यायालयात ओळखपरेड घेण्यात आली होती. दरम्यान, या खटल्याचे कामकाज पनवेलच्या सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात वर्ग केल्यापासून या खटल्याचे कामकाज आता वेगाने सुरु झाले असून या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागेल, असा विश्वास अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांना आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या २७ मार्च रोजी होणार आहे.
अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण पनवेल न्यायालयात पती राजू गोरे यांची उलट तपासणी