शिवसेनेत केला प्रवेश... भाजपच्या दोन नगरसेविकांचा राजीनामा


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर काही नगरसेवक, पदधिकारी, कार्यकर्ते यांचे प्रामुख्याने शिवसेनेतून भाजप व भाजपमधून शिवसेनेत जाण्याचा सिलसिला सुरुच असून काल नेरुळ येथील भाजपच्या नगरसेविका कविता आगोंडे आणि सुरेखा नरबागे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी तुर्भेतील भाजपचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी व संगीता वास्के यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर घणसोलीतील शिवसेनेच्या प्रशांत पाटील, कमलताई पाटील व सुवर्णा पाटील या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नेरुळ शिवाजी नगर येथील भाजपच्या नगरसेविका कविता आगोडे आणि बेलापूर येथील भाजपच्या नगरसेविका सुरेखा नरबागेयांनी काल दुपारी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे दिला. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, शहरप्रमुख विजय माने, अशोक नरबागे, विभागप्रमुख अरुण गुरव, सुनील सातपुते आदी उपस्थित होते. दरम्यान, मी पुर्वी शिवसेनेत होतो. दोन वेळा मी शिवसेनेचा नगरसेवक राहिलो आहे. मध्यतंरी गणेश नाईक यांच्याबरोबर अन्य पक्षात गेलो असलो तरी तिथे बैचेन होतो. आता पुन्हा माझ्या स्वगृही परतलो याचा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत आगोंडे यांनी यावेळी व्यक्त केली.