पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल शहर परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी मालकीचे मोकळे प्लॉट असून सदर प्लॉटवर मोठ्या प्रमाणात झाडी-झुडूपे, रानटी गवते तर काही ठिकाणी सदर प्लॉटवर डम्पिंग करण्यात येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. तसेच येथील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पनवेल महापालिका प्रशासनाने सदर प्लॉट मालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. पनवेल शहर तसेच परिसरात अनेक प्रकारचे मोकळे प्लॉट खाजगी मालकीचे आहेत. त्या ठिकाणी अनेकांनी साधे कंपाऊंड सुद्धा घातले नाही आहे. त्यामुळे या उघड्या मोकळ्या प्लॉटवर परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा, इतर सामानसुमान टाकण्यात येते. अनेक हॉटेल व्यावसायिक व टपरीवाले या प्लॉटवर साठलेला कचरा व उरलेले खाद्यपदार्थ रात्रीच्या वेळेस टाकतात. त्यामुळे तेथे मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात जमतात. तसेच तेथे झुडूपे व रानटी गवत वाढल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो व त्याचा नाहक त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात परिसरातील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक तसेच महापालिकेकडे व आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनसुद्धा यावर कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
box
मोकळ्या प्लॉट संदर्भात महापालिकेच्या बैठकीत हा विषय काढण्यात आला असून संबंधित मालकांना नोटीसा बजाविण्यात प्रशासनाला सांगितले आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे त्या प्लॉटवर इंम्पिंग होत असेल तर महानगरपालिकेने स्वतः यंत्रणा राबवून तो परिसर स्वच्छ करावा व आलेला खर्च संबंधित प्लॉट मालकाकडून वसूल करावा अशा प्रकारच्या सूचना व प्रस्ताव सुद्धा महापालिकेकडे मांडला असल्याची माहिती नगरसेवक विक्रांत पाटील यांनी दिली.