३१ मार्च पर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड


मुंबई - पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२० ही शेवटची मुदत आहे. या मुदतीपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर थोडा थोडका नाही १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. एवढंच नाही तर पॅन कार्ड चुकीचं असेल म्हणजेच त्यावर चकीची माहिती असेल आणि ते आधारशी लिंक झालं नाही तरीही एवढाच दंड भरावा लागणार आहे. इन्कम टॅक्स कायदा सेक्शन २७२ बी अन्वये हा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे आधार आणि पॅन लिंक करा नाहीतर १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले नाही तर इतर अनंत अडचणींचा सामना असं करणाऱ्यांना करावा लागणार आहे. जे आधार आणि पॅन ३१ तारखेपर्यंत लिंक करणार नाहीत त्यांचे आधार १ एप्रिल २०२० पासून बाद ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आधार कार्डाची गरज एक ओळखपत्र म्हणून तर आहेच याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, बँक अकाऊंट, ५० हजारांच्या वरचे व्यवहार यासाठीही ते महत्त्वाचे आहे. मात्र ३१ मार्च पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते या सगळ्या प्रक्रियांसाठी वापरता येणार नाही अशीही शक्यता आहे. जोपर्यंत दंड भरुन आधार आणि पॅन कार्ड लिंक केले जात नाही तोपर्यंत त्या संबंधित व्यक्तीला या सगळ्या प्रक्रिया करता येणार नाहीत अशीही माहिती समोर येते आहे. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.