उलव्यात भरदिवसा महिलेची हत्या करणारा अटकेत

आरोपी विरोधात दाखल आहेत वाहन चोरीचे गुन्हे


नवी मुंबई (प्रतिनिधी) - उलवे से-१९ येथून महिलेचे कारसह अपहरण करून त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या करणा-यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खारघर येथून सापळा रचून देशी बनावटीच्या । पिस्टल, काडतुस व चोरीच्या कारसह अटक केली आहे. उलवे से-१९ येथे सोमवारी भरदिवसा ही घटना घडली होती. अशोककुमार मृर्गन कोनार (वय ४२, रा.उलवे से-९) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा रहिवाशी आहे. तर प्रभावती बाळकृष्ण भगत (५६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी प्रभावती हिचे पती बाळकृष्ण बाळाराम भगत (वय ६३, रा. शेलघर ) यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर आरोपी विरोधात यापूर्वी मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पनवेल तालुक्यातील शेलघर येथील बाळकृष्ण बाळाराम भगत हे पत्नी प्रभावती भगत हिच्यासह सोमवार डि. २ मार्च रोजी दुपारच्या सुमारास आपल्या कारमधून उलवे से- १९ या परिसरात आले होते. तेथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या बँकेसमोर आपली कार उभी करून पत्नी प्रभावती भगत हिला कारमध्ये बसवून बाळकृष्ण भगत हे पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटर मध्ये गेले होते. याचवेळी तेथे आलेल्या आरोपीने प्रभावती भगत यांचे कारसह अपहरण करुन कार उलवे से-२३ येथील सुनसान परिसरात नेऊन प्रभावती भगत यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. व घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी तपास कामी एका विशेष पथकाची स्थापना करून पोलिस पथकाकडून आरोपीचा तपास सुरु होता. यात तांत्रिक तपास , गोपनीय माहिती व इतर बाबींने तपास केला असता आरोपी व त्याने वापरलेले वाहन निष्पन्न झाले होते. दरम्यान, दि. ४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी हा कारसह तळोजाकडून खारघर परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकांनी विकास भवन चौक खारघर याठिकाणी सापळा लावून आरोपी अशोककुमार मृर्गन कोनार यास ताब्यात घेतले . त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केल्याने दि.४ मार्च रोज आरोपी अशोककुमार मृर्गन कोनार यास पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिसांनी aman सांगितले. आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केलेली कार त्याने वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली असून याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या कारला बनावट नंबर प्लेट लावून तो ती कार वापरत होता. सदर आरोपी विरोधात यापूर्वी मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास एनआरआय पोलीस करीत आहेत.


box


हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार?


दरम्यान, आरोपी अशोककुमार मृर्गन कोनार हा सराईत वाहन चोरटा आहे. पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केलेली कार त्याने वाशी फँटासिया मॉलच्या परिसरातून काही दिवसांपूर्वी चोरली होती. वर्ष २०१५ मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात वाहन चोरीचा गुन्हा दाखल असून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.