विविध कार्यक्रमांना महिलांसह नागरिकांनी दिली दाद
बेलापूर (वार्ताहर)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करावेगाव प्रभाग क्र.११० येथील नगरसेवक विनोद म्हात्रे व माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांच्यावतीने जय मातादी माँ महिला मंडळातर्फे आयोजित हळदीकुंकू समारंभास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त 'वारसा माझ्या महाराष्ट्राचा'या अनोख्या कार्यक्रमासह महिलांसाठी खेळ पैठणीचा व इतर विविध पार पडलेल्या कार्यक्रमांना महिलांसह नागरिकांनी चांगलीच दाद दिली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यासह कल्पना नाईक, प्रांजल नाईक, वंदना तांडेल व इतर विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते लकी ड्रॉ मधील विजेत्यांना व महिलांना आकर्षक अशी बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. आ. गणेश नाईक यांनी याप्रसंगी आयोजक म्हात्रे दाम्पत्याचे विशेष कौतुक केले. करावेगावची परंपरा संगीत क्षेत्राची राहिली आहे. नाटयक्षेत्रात या गावाचे नवी मुंबईत एक नावाजलेले योगदान राहिले आहे असे गौरवोद्गार व्यक्त करतांनाच नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात राबविलेल्या विविध उपक्रमांचे व नागरी कामांचे आ. गणेश नाईक यांनी कौतुक करण्याबरोबरच भविष्यात करावेगावव्या विकासासाठी विशेष लक्ष पुरविण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक विनोद म्हात्रे व माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनीही मनोगतातून गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द राहणार असल्याचे सांगितले.