नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी वाशीतील एपीएमसी मार्केटने सुद्धा खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये येणारा माल नाशवंत असतो, त्यामुळे मार्केट बंद ठेवणे शक्य नाही. तसे केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी करु नये, यासाठी होलसेल व्यापा-यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरुन ऑर्डर देण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी टेम्पोच्या माध्यमातून ऑर्डर केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून हजारो किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी दररोज एपीएमसी बाजारपेठेत येत असतात. एपीएमसी बाजार बंद ठेवणे शक्य नाही. कारण तसे केल्यास शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होईल. शिवाय शहरामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होईल. म्हणून एपीएमसी मार्केट शक्य तितकी खबरदारी आपल्यापरीने घेत आहे.
कोरोनोमुळे एपीएमसीत ऑनलाईन व्यवहार