मुंबई (प्रतिनिधी) - करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर व खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचं सांगितलं. तो रुग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसंच सॅनिटायझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद; परीक्षाही पुढे ढकलल्या!