कोरोना: एनएमएमटी बसवर औषध फवारणी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेतर्फे कोरोना व्हायरसच्या प्रकोपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी एनएमएमटी प्रशासन सज्ज झाली असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनएमएमटीच्या तुर्भे व आसुडगाव या दोन आगारातून बाहेर पडणाऱ्या एनएमएमटीच्या बसेसह एनएमएमटीचे स्टॉप आदी ठिकाणी बसवर सॅनिटराइज युक्त औषध फवारणी केली जात आहे. विशेष म्हणजे एनएमएमटीमधील चालक व वाहक यांचा ड्युटीदरम्यान प्रतिदिन असंख्य प्रवाशांसी संपर्क येत असल्याने त्यांना खबरदारी म्हणून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. परिवहनचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्या नेतृत्वात हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. एनएमएमटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनातर्फे ही उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. या अंतर्गत वातानूकुलीत बसवर दिवसातुन ३ वेळा, साधारण बसमध्ये दोन वेळा तसेच बस स्टॉपवर एक वेळा औषध फवारणीचे काम साफ सफाई कर्मचा-यांकडून केले जात असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरडवाड यांनी सांगितले. चालक-वाहकांनीही खबरदारी म्हणून चेहऱ्यावर रुमालाचा व शक्य असल्यास मास्कचा वापर करून काळजी घ्यावी असे आवाहन आरदवाड यांनी केले आहे.