कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची खबरदारी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विविध खबरदारीपर उपाय योजले असून परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांचे नवी मुंबईत अलगीकरण करण्यात येत आहे. परदेशातून भारतात आलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांना १४ दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर १४ येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांव्दारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन महापालिकेने सर्व टुर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट यांच्याकडून परदेशी प्रवास करून आलेल्या व येत असलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांची माहिती संकलीत केली असून यापुढील काळात कोणतीही व्यक्ती परदेश प्रवास करणार नाही याविषयी काटेकोर निर्देश दिलेले आहेत. तसेच या टुर्स व ट्रॅव्हल्स एजन्ट्सकडून तसेच महाराष्ट्र शासनाचा विमानतळावरील कक्ष आणि सोसायटीचे पदाधिकारी व जागरूक नागरिक यांच्याकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार महापालिकेने स्थापन केलेले विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद पथक परदेशी प्रवास करून आलेल्या संबंधितांकडे त्वरीत पोहचत असून ती प्रवासी व्यक्ती नवी मुंबईत कधी परत आली, त्यांना सर्दी, खोकला किंवा ताप अथवा तत्सम लक्षण आहे काय अशी पाहणी करीत आहेत तसेच त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेत आहे. परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तींची सध्या प्रकृती सर्वसाधारण असली तरी या प्रवाशांना १४ दिवस अलगीकरण करून राहणे गरजेचे असल्याचे पटवून दिले जात आहे व त्यांना घरातच अलगीकरण करून राहण्यास सांगितले जात आहे. असे अलगीकरण केले जात असताना त्यांच्या संपर्कात घरातील एकाच व्यक्तीने किमान १ मीटर असे पुरेसे अंतर ठेवून त्यांची व स्वत:ची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. अशा प्रवाशांशी नवी मुंबई महापालिकेचे त्या विभागातील आरोग्य अधिकारी दररोज दिवसातून किमान ३ वेळा संपर्क साधत असून शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत त्यांचे निरीक्षण केले जात आहे व त्यांची आवश्यक काळजी घेतली जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. ___परदेश प्रवास करून आलेले जे प्रवासी अशाप्रकारे घरातच १४ दिवस अलगीकरण करून राहण्यास तयार होत नाहीत त्यांना पोलीसांच्या मदतीने त्यांच्या घरातच अलगीकरण कार्यवाही करून घेण्यात येत आहे अथवा नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या अलगीकरण कक्षात त्यांना दाखल करून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परदेशी प्रवास करून आलेल्या ज्या प्रवाशांची घरे लहान आहेत व घरात अलगीकरण करणे शक्य नाही, किंवा ज्यांच्या घरी काळजी घेणारे कोणी नाही, अशा प्रवाशांनाही अलगीकरण कक्षात दाखल करून घेण्यात येत आहे. _कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये याकरिता आवश्यक ती सर्व खबरदारी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने घेण्यात आली महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात ३८ बेड्स व आवश्यक व्हेंटिलेटर्सची सुविधा असणारा विलगीकरण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील अलगीकरण कक्षात १६ परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांना दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी त्यांची जेवणासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.