नवी मुंबईची सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर?
मुंबई (प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे येत्या एप्रिलमध्ये होऊ घातलेली नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकही आता लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत असून निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होईल, याबाबत तूर्त तरी अनिश्चितता असल्याचे मानले जात आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीचा पहिला हप्ता म्हणून ४५ कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहुन क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ही सर्व कार्यवाही करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल येथे केले.