डॉक्टरांचे नागरीकांना आवाहन... कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही!

उरण (प्रतिनिधी)- कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, कोणी नागरिक कोरोना रुग्णासोबत किंवा त्यांच्या सानिध्यातून आले असेल आणि त्यास लक्षणे दिसत असतील तर त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्वांनी मास्क घालणे आवश्यक नाही. मात्र ज्यांना खोकला, सर्दी आहे त्यांनी मास्क घालावे, असे आवाहन उरणमधील डॉक्टरांनी नागरीकांना केले आहे. सर्वाधिक विषाणूंचा प्रादुर्भाव चीनमधूनच झाला. साधारण ७५ टक्के विषाणू पसरण्याचे स्थान चीन होते. तेथे कमी शिजवलेले अन्न व कच्चे मांस खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे प्राण्यांमधून या रोगाचा मानवामध्ये प्रादुर्भाव झाला. सध्या या विषाणूवर औषध नाही. तसेच सोशल मीडियावर या रोगाबाबत अफवा पसरवून एकप्रकारे दिशाभूल केली जात आहे त्यापासून निश्चितच सावध राहायला हवे. रोग पसरण्याची गती फार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने उरणमधील नागरीकांमध्येही या आजाराबद्दल भीती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या रोगाच्या तुलनेत, डेंग्यू, स्वाईन फ्लू, 'हेपेटायटीस-बी' हे रोग आपल्याकडे धोकादायक ठरले आहेत. योग्य काळजी घेतली तर रुग्ण हमखास बरा होतो. प्रतिबंधात्मक उपाय करण्यास व सावधगिरी बाळगण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एखाद्याला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय असे वाटले तर तत्काळ डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन पालवी हॉस्पिटलचे डॉ.सुरेश पाटील, उरण मेडीकल वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे, शारंगधर हॉस्पिटल कोटनाका उरणचे डॉ. सत्यनारायण ठाकरे, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय सुप्रीटेंड डॉ. मनोज भद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ईटकर यांनी उरणवासीयांना केले आहे.