अल्पवयीन मुलाकडून विनापगार सक्तीने काम!

पनवेल (प्रतिनिधी) - अल्पवयीन मुलांना सक्तीने सोन्याचे मणी बनविण्याच्या कामाला लावून त्यांना फुकट १२-१२ तास राबवून घेऊन मारहाण करणा-या पनवेल मधील अमर साह शेट या सोन्या-चांदीच्या कारागीरा विरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पनवेलमधील कच्छी मोहल्ला परीरसरात राहणाऱ्या अमर साहू या कारागीराने पाच महिन्यापुर्वी पश्चिम बंगाल येथून १३ वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना कामासाठी पनवेल येथे आणले होते. त्यानंतर अमर साहू याने दोन्ही अल्पवयीन मुलांना सक्तीने सोन्याचे मणी बनविण्यासाच्या कामाला लावले होते. दोन वेळचे जेवण देत तो मुलांना १२-१४ तास विनापगार राबवत असे. सदर मुलांकडून कामात काही चुक झाल्यास त्यांना शिवीगाळ व मारहाण करुन त्यांचा मानसिक व शारीरीक छळ करत होता. या छळाला कंटाळू न दोन्ही मुलांनी गत ३ मार्च रोजी आपल्या मुळ गावी कलकत्ता येथे जाण्यासाठी अमर साहू याच्या दुकानातून पलायन करुन ठाणे रेल्वे स्टेशन गाठले. यावेळी सदर दोन्ही मुले ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींच्या हाती लागल्यानंतर अमर साहूचे बिंग फुटले. आता त्याच्या विरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) २०१५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.