नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यास काल प्रारंभ झाला असून गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी १०४ तसेच नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी १२७ प्रवेशिका दाखल झाल्या. त्यामध्ये गायन स्पर्धेत वैयक्तिक गायनाकरीता लहान गटात २० आणि मोठ्या गटात ४४ प्रवेशिका दाखल झाल्या. समुह गायनात लहान गटामध्ये ६ व मोठ्या गटामध्ये १४ प्रवेशिका दाखल झाल्या. वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात ४३ व मोठ्या गटात ४३ प्रवेशिका त्याचप्रमाणे समुह नृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात २१ व मोठ्या गटात २६ प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त नितिन काळे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, सुप्रसिध्द संगीतकार चिनार, महेश आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महापौर चषक स्पर्धा जाहीर केल्यानंतर प्रवेशिका भरण्यासाठी उदयोन्मुख कलावंतांची एकच झुंबड उडाली. मात्र ८० ते ९० कलावंतांना मर्यादमुळे प्रवेश देणे शक्य झाले नाही. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे मत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती व स्पर्धा निमंत्रक डॉ. जयाजी नाथ यांनी व्यक्त केले.
महापौर चषक गायन व नृत्य स्पर्धेचा महाअंतिम सोहळ्यास प्रारंभ