अशा आरोपींची गय नको!

अलिकडच्या काळात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना जनमनात संताप व्यक्त करीत असून राज्यातील अनेक भागात विनयभंग, बलात्कार यासारखे अमानवी आणि घृणास्पद प्रकार घडत आहेत. कुठल्याही वयातील मुली, महिलांबाबत असे प्रकार घडत असून मग ती विद्यार्थिनी आहे की, गृहिणी आणखी कोणी... अशा साऱ्यांबाबत अशा घटना घडत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा भागात अलिकडच्या काळात अशा घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत, मात्र त्यानंतर या आरोपींना जामीन मिळतो आणि ते बाहेर येतात. न्यायालयात निकाल लागला अगदी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली तरी तशी शिक्षा होण्यासही विलंब लागत आहे. तारीख पे तारीख पडत आहे, निर्भया केसप्रकरणातून उघड झाले आहे. यामुळे लोकांचा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होण्यास मदत होऊ शकते. नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील मुलींशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला आणि शहरात एकच खळबळ माजली. संबंधीत आरोपीला अटक केली असली तरी त्याचे हे कृत्य भयंकर स्वरुपाचे होते, शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारे होते. या गुन्हेगारास कठोर शासन व्हावे अशी मागणी होत आहे ती रास्तच आहे. अशा घटनांबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास होत गुन्हेगारास लवकरात लवकर कठोर शासन मिळण्यासाठी प्रयत्न व्यहयला हवेत, अशी जनतेची इच्छा आहे. मात्र अशी इच्छा पूर्ण शक्य आहेच असे नाही, असे दर्शवणाऱ्या घटनाही घडत आहेतच हे नक्की. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघा दोषींना काल फाशी देण्याची तयारी झाली होती. पण दोषींपैकी एका आरोपीने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली. या याचिकेवर निर्णय झालेला नाही. यामुळे चौघांना काल होणारी फाशी टळली आणि याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्याबाबतचे तारीक पे तारीखचे सत्र सुरुच राहिले आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आधीच्या आदेशानुसार निर्भयाच्या दोषींना काल म्हणजे ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार होती. मात्र पतियाळा न्यायालयाच्या स्थगितीने दोषींची फाशी तिसऱ्यांदा टळली आहे. याला काय म्हणावे. निर्भयाच्या सर्व चार दोषींची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार तिराह तुरुंगात त्यांना फासावर लटकवण्यासाठी तयारीही सुरू झाली होती. पण चौघा दोषींपैकी पवनच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी निर्णय दिलेला नाही. त्याच्या दया याचिकेवर निर्णय व्हायचा आहे. हे समोर आल्यावर पतियाळा हाऊस न्यायालयाने दोषींना फाशीवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. यावर निर्भयाच्या आईनेही आपला संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण समाजमन ढवळून निघाले. मात्र तरीदेखील या आरोपीला शिक्षा कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आरोपीला शिक्षा होण्यास होणारा विलंब दुर्देवी म्हणावा लागेल. या आरोपींना शिक्षेसाठी जो विलंब होत आहे, त्यामुळे याबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. आंध्रप्रदेश राज्यात दिशा कायदा अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याने बलात्कार्यांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातही असा कायदा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, हे स्वागतार्ह असले तरी यासाठी अधिक वेळ घालवता काम नये! अशा आरोपींची अजिबाद गय नको!!