नवी मुंबई (प्रतिनिधी) - तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलांचे तब्बल ३० कोटी रुपयांचे कंत्राट देतांना या कंत्राटाच्या मंजुरीशी आणि भविष्यातील उद्भवणा-या समस्यांसाठी प्रशासनाला जबाबदार धरु नये तर सदर कामाची सर्वस्वी जबाबदारी महासभा व स्थायी समितीत या कंत्राटास मंजुरी देणा-या लोकप्रतिनिधींची असेल अशा आयुक्तांच्या स्पष्टीकरणासह सदर केलेला प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने मंजूर केला. आर्थिक दृष्ट्या बँकांनी दिवाळखोर ठरविलेल्या मे. महावीर कंन्ट्र क्शन या ठेकेदारास या उड्डाणपूलाचे काम देण्यात आले होते. शहर गतीशील योजनेंतर्गत ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे स्टेशनसमोर या उड्डाणपूलाची उभारणी होणार आहे. सदर उड्डाणपूलाचे काम २००५ साली सुरु होणार होते. मात्र नागरीकांच्या विरोधामुळे उड्डाणूलाचे काम त्यावेळी रद्द झाले होते. मे. महावीर रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी महापालिकेची नागरी कामे अर्धवट अवस्थेत सोडल्याने व बँकांनी त्यांना दिवाळखोर म्हणून जाहीर केल्याने प्रशासनाचा त्यासाठी विरोध होता. मात्र मुख्यमंत्री कार्यालयापासून ते स्थानिक सत्ताधारी वर्गांपर्यंत सर्वांचाच पाठींबा असल्याने प्रशासनाचा विरोधही त्यासाठी तोकडा पडला. उच्च न्यायालयात महापालिकेची बाजू मांडणारे अॅड. मारणे यांच्या मते मे. महावीर रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. हे दिवाळखोर झाल्यामळे त्यांची निविदा मंजूर करावी किंवा कसे याबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा, असा अभिप्राय अॅड. मारणे यांनी दिला होता. त्यानुसार ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधणे या कामाची फेरनिविदा मागविण्यात येत ती दि.२४ डिसेंबर २०१९ रोजीच्या महासभेत ठराव क्र.१५३७ अन्वये मांडण्यात आली व सभागृहाची त्यास संमती मिळाली होती. सदर कामाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. २१कोटी ४९ लाख ९ हजार ७२७ इतकी असून न्यूनतम निविदादाराने दिलेले दर रु.२७ कोटी ७३ लाख इतके आहे. न्यूनतम निविदा दाराने दरामध्ये दिलेली सूट रु.४६ लाख असून निविदेची एकूण रक्कम रु.२७ कोटी २७ लाख इतकी आहे. जीएसटी करासह हीरक्कम रु.३० कोटी ५४ लाख २४ हजार रु. इतकी होत आहे. सदर कामाचा कालावधी १८ महिन्यांचा निर्धारित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मे. महावीर रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीची निविदा स्थायी समितीकडे स्विकृतीसाठी सादर करण्याचा प्रस्ताव विभागाने सादर केला आहे. त्यामुळे सदर कंपनीस स्थायी समिती व महासभेच्या ठरावानुसार काम मंजूर केल्यास व त्यानंतर मे. महावीर रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीकडून सदर काम योग्य पध्दतीने व विहीत वेळेत पूर्ण न केल्यास किंवा कामाची गुणवत्ता किंवा वाढीव खर्च आल्यास याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट करत तुर्भे तील प्रस्तावित उड्डाणपूलाचे काम देण्याप्रकरणी कानावर हात ठेवतानाच याबाबतची सारी जबाबदारी लोकप्रतिनिधींवर ढकलल्याचे दिसून येते.
जबाबदारी ढकलली लोकप्रतिनिधींवर...तुर्भेतील उड्डाणपूलाचे कंत्राट देतांना प्रशासनाचे कानावर हात!