सीसीटीव्ही अभावी उलवे नोडची सुरक्षा वाऱ्यावर!

महिलेच्या हत्येनंतर प्रकार उघडकीस


नवी मुंबई (नितीन पडवळ) - नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कामकाजामुळे उलवे नोंडचा झपाट्याने विकास जरी होत असला तरी या भागातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाबाबत अजूनही सिडकोचे दुर्लक्ष झाले असून त्याचा शासकीय यंत्रणांसह नागरिकांनाही विविध बाबतीत फटका सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. नवी मुंबई शहरातील गुन्ह्यांत वाढ होत असल्याने त्यावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून सिडकोने काही कोटी रुपये खर्च करुन शहरातील विविध भागांत सीसीटीव्ही बसविण्याचे प्रस्तावित करत त्यानुसार खारघर व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र सिडकोने काही वर्षांपूर्वी नव्याने विकसित केलेल्या उलवे नोडमध्ये अजूनही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू झाले नसल्याने सीसीटीव्ही अभावी उलवे नोंडची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे. आहे. सीसीटीव्हींमुळे अर्थात तिसऱ्या डोळ्यामुळे शहरातील गुन्ह्यांवरही नजर ठेवता येणे पोलीस यंत्रणेला सोयीस्कर व विविध गुन्ह्यांची उकल करण्याकामी मोलाची मदत होत असतेमात्र सिडकोच्या उलवे नोंडमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अजून लागू शकली नसल्याने येथील नागरिकांची सुरक्षा राम भरोसे आहेनुकतीच उलवा सेक्टर-१९ या भागात एका महिलेची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला. मात्र या भागात अजूनही सीसीटीव्ही यंत्रणा लागू शकली नसल्याने पोलिसांच्या तपासात अडसर निर्माण झाला नवी मुंबई शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने गेल्या काही वर्षांपासून शांत शहर अशी ओळख असलेल्या या शहरात आता विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सिडकोने शहरात काही कोटी रुपये खर्च करुन सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजित करत एका मोठ्या कंपनीला याबाबतचे कामही दिले आहे. त्यानुसार खारघर, तळोजा व इतर भागात ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मात्र, सिडकोची ही योजना उलवे नोडमध्ये फोल ठरल्याचे उघडकीस आले आहेनवी मुंबई विमानतळ उभारणीचे काम उलवे या भागात सुरु असल्याने या नोडमध्येही मूलभूत सोयीसुविधा व मोठ्या प्रमाणात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्याची रहिवाशांची मागणी आहे. यापैकी उलवे नोड अजूनही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी शेलघर येथील प्रभावती भगत नावाच्या महिलेची भरदिवसा घडून आलेली हत्येची घटना पाहता या भागात सीसीटीव्ही यंत्रणा असणे किती गरजेचे आहे ही बाब अधोरेखित झाली आहेसोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उलवे सेक्टर-१९ येथे कारमध्ये प्रभावती भगत कारमध्ये बसून बँकेत गेलेल्या आपल्या पतीची वाट बघत होत्या. यावेळी तिथे आलेल्या अज्ञाताने प्रभावती ज्या कारमध्ये बसल्या होत्या. ती कार पळवून प्रभावती यांचेही अपहरण केले. व नंतर पुढे चौकाजवळ मारेकऱ्यांनी प्रभावती यांच्यावर गोळ्या झाडात त्यांची हत्या करून मारेकरी तेथून पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, प्रभावती यांचे पती बँकेतून बाहेर आले तेव्हा त्यांना कार बँकेबाहेर दिसली नाही म्हणून त्यांनी पत्नी आणि कारचा शोध सुरु केल्यानंतर कार वहाळ गावाजवळ असल्याचे आणि त्यांच्या पत्नीवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केल्याचे त्यांना समजले. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरु करण्यात आला. मात्र अजूनही सदर परिसरात सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्याने पोलीस यंत्रणासुद्धा या प्रकाराने चक्रावली. दरम्यान, घटनेच्यावेळी प्रभावती यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात दागिने होते. त्यापैकी एकही ग्रॅम दागिन्यांना हात लावण्यात आला नसल्याची बाब पोलीस तपासातून पुढे आली असून प्रभावती यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून झाली असावी याबाबतचे गूढ वाढले असून पोलीस इतर बाजूनेही या घटनेचा तपास करत आहे. या घटनेतील मारेकरी सापडल्यानंतरच या हत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहेएनआरआय पोलिसांनी या घटनेतील अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. मात्र कोणताही गुन्हा घडल्यानंतर पोलिसांच्या तपासासाठी महत्वाची भूमिका बजावणारी सीसीटीव्ही यंत्रणा येथे अद्यापी बसू शकली नसल्याने पोलिसांचा तपासच खंटला असून पोलीस तपासात अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, उलवे नोडमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता या भागात सिडकोने सीसीटीव्ही तातडीने बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यासंदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना संपर्क साधला असता, उलवेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. अजून तेथे सीसीटीव्ही बसविले नाहीत. खारघर व इतर ठिकाणी सिडकोतर्फे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली ते व्यवस्थितरित्या सुरु आहेत. शहरात महापालिका हद्दीत महापालिकेकडून व सिडको हद्दीत सिडकोतर्फे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत असल्याचे, त्यांनी सांगितले.