बालभवन उभारणीसाठी सिडकोचा हिरवा कंदील - आ.मंदा म्हात्रे


नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबईत बालभवन उभारण्याची मागणी सिडको व राज्य शासनाकडे करण्यात आली होती, त्यास सिडकोकडून हिरवा कंदील देण्यात आला असून याबाबत जागा निश्चितीबाबत विचार सुरु असल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी दिली. नवी मुंबईत अनेक बालकलाकार निर्माण होत आहेत. तबलावादक, गायन, हार्मोनियम, बासुरी, वीणा आदी संगीतातल्या इतर दुर्मिळ वाद्यांच्या माध्यमातून या बालकलाकारांनी आपली ओळख निर्माण केली आहे. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होणे आवश्यक आहे. यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आ. मंदा म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे याबाबतची मागणी केली होती. तसेच सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांजबरोबर यासंदर्भात निवेदन देत बैठका घेऊन सदर बालभवन उभारणीसाठी भूखंड उपलब्ध करण्याची मागणी केली होती. अखेरीस याबाबतच्या शासन व सिडको प्रशासन पातळीवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर बालभवन उभारणीकरिता सिडकोने हिरवा कंदील दिला आहे. बेलापूर मतदार संघामध्ये कोणत्या संकुलामध्ये बालभवन उभारायचे, याबाबत सिडकोने आ. मंदा म्हात्रे यांच्याकडे विचारणा केली असता, सिडकोने अनेक भूखंड सामाजिक सेवेकरिता आरक्षित के ले असल्याने त्यातीलच एखादा भूखंड किंवा नवी मुंबई _महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या भूखंडापैकी एखादा भूखंड बेलापूर मतदारसंघातील नेरूळ, सीवूड्स, सानपाडा व वाशी अशा मध्यवर्ती ठिकाणी बालभवन निर्मितीकरिता देण्यात यावा असे सुचविण्यात येणार असल्याची माहिती आ.मंदा म्हात्रे यांनी दिली. बालभवन निर्मितीकरिता आता सिडको भूखंड उपलब्ध करून देत असल्याने नवी मुंबईच्या विकासात बालभवनाच्या रूपाने भरच पडणार आहे. भविष्यात नवी मुंबई कलाकारांची नगरी म्हणून नावारूपाला येईलच; परंतु त्यासाठी सुरुवात होणे गरजेचे होते, असेही आ. मंदा म्हात्रे म्हणाल्या.