मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, सरकारी कार्यालये बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, तसेच लोकल आणि बससेवा अत्यावश्यक असल्याने बंद होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. सरकारी कार्यालयांना ७ दिवस सुट्टी जाहीर केल्याचे वृत्त दुपारी प्रसारित झाले होते. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पत्रकारपरिषदेतून स्पष्टीकरण देत मुंबईतील लोकल सेवा सुरु राहणार का; तसेच सरकारी कार्यालये बंद राहणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होतेमुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा बंद करण्यात येणार नाही. मात्र लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दी कमी करावी. अन्यथा आम्हाला इच्छा नसतानाही कठोर पावलं उचलावी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईतील लोकल आणि बस सेवा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा काल सकाळपासून सुरू होती. याबद्दलचा निर्णय मंत्रिमडळाच्या बैठकीतच होऊ शकतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यामुळे मुंबईकरांचे लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले होते. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केलं. आरोग्याच्या बाबतीतही सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुटी देण्यात आलेली नाही. 90 टक्के उपस्थितीबाबत आम्ही विचार करतो आहोत. सरकारी कर्मचारी कमी उपस्थितीत जास्तीत जास्त काम कसं करु शकतील? याबाबत आम्ही विचारविनीमय करतो आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. - राज्यात सध्या ४० जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४० रुग्णांमध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. यातल्या एकाचा अपवाद वगळल्यास इतरांची प्रकृती स्थिर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं.जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहावीत. मात्र इतर वस्तूंची दुकानं बंद करावीत, अशी विनंती त्यांनी दुकानदारांना केली.
सरकारी कार्यालये बद नाहीत; ट्रेन, बस सुरूच राहणार