दोन्ही किडन्या निकामी तरीही दिवसाला चालवतो १२ तास रिक्षा


नवी मुंबई (प्रतिनिधी) - दोन्ही किडन्या निकामी झालेल्या असताना दिवसाला १० ते १२ तास रिक्षा चालवून आपले कुटुंब चालविणाऱ्या नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणारे दत्तात्रयनाथ जोबी (वय ३५) यांचा विशेष सत्कार तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ञ डॉ. जितेंद्र खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे काल जागतिक मूत्रपिंड (किडनी) दिनानिमित्त डायलासिस रुग्णांसाठी आरोग्य संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी हा सत्कार करण्यात आला. ___ यावेळी डॉ. जितेंद्र खांडगे म्हणाले की, आपल्या देशातील सुमारे १४.५ टक्के महिला व १२ टक्के पुरुष मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त असून दरवर्षी नवीन दोन लाख नागरिक मूत्रपिंडाच्या आजाराला सामोरे जात आहेत. भारतामध्ये मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक रुग्ण या उपचारांमुळे मानसिक विकाराला बळी पडत आहेत, अशा रुग्णांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण करण्यासाठी आरोग्य संमेलन आयोजित केले असल्याचे सांगितले. दोन्ही किडन्या फेल तरीही दिवसाला १० ते १२ तास रिक्षा चालविणारे दत्तात्रयनाथ जोबी यांचा केलेला सन्मान म्हणजे मूत्रपिंड __विकाराच्या रुग्णांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न होय, असेही डॉ. खांडगे म्हणाले आजच्या युवा पिढीमध्ये आवड अथवा वेळेच्या अभावी बाजारातील तयार पदार्थ खाल्ले जातात, या प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते यामुळे मूत्रपिंडाचे आरोग्य बिघडते अशी माहिती आहारतज्ञ प्रतीक्षा कदम यांनी दिली. तर कार्डिओ थोरॅसिक सर्जन डॉ भास्कर सेमीथा यांनीसुद्धा विविध आजारांवर मार्गदर्शन केले.