दूरगामी नियोजनामुळेच नवी मुंबईचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमान -आ.गणेश नाईक
नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका नागरिकांसाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच सेवाभावी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये नेहमीच आघाडीवर राहिली असून सुरुवातीपासून दूरगामी नियोजन केल्यामुळेच नवी मुंबईचा नेहमीच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहमान झाला आहे, असे प्रतिपादन सल्याचे आ.गणेश नाईक यांनी केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथे सेक्टर १४-१५ (प्र.क्र.५८) उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण काल आ.गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. तसेच दर इमारतीचे स्वामी विवेकानंद असे नामकरण करण्यात आले. यावेळी आ.गणेश नाईक बोलत होते. महापौर जयवंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ, प्रभाग समिती अध्यक्ष अंजली वाळुज व उषा भोईर, वाशी विभागाचे सहा. आयुक्त महेश हशेट्टी, कार्यकारी अभियंता सुनिल लाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सदर बहुउद्देशीय इमारतीतून नागरिकांच्या छोट्या- मोठ्या विविध कार्यक्रमांसाठी एक अद्ययावत सभागृह उपलब्ध होत असून त्यासोबतच नागरी आरोग्य केंद्र, व्यायामशाळा व आंतरक्रीडा प्रकारांसाठी जागा, वाचनालय अशा बहुविध सुविधांचा लाभ नागरिकांना यामधून घेता येणार असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी दिली. वाशी सेक्टर १४/१५ मध्ये भूखंड क्र. ४२ अ येथे साधारणत: ११ कोटी रक्कम खर्च करून ही ४ मजली भव्यतम बहुउद्देशीय इमारत उभारण्यात आलेली असून तळमजल्यावर चारचाकी ३२ वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था आहे. सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २८०५ चौ.फू. क्षेत्रफळात नागरी आरोग्य केंद्र तसेच १३ चार चाकी वाहनांची वाहनतळ व्यवस्था आहे. दुसऱ्या मजल्यावर ४१४१.६३ चौ.फूटाच्या जागेत व्यायामशाळा व आंतरक्रीडा प्रकारांसाठी जागा उपलब्ध आहे. तिसऱ्या मजल्यावर ४३९८ चौ.फूटाच्या जागेत वाचनालय असणार असून चौथ्या मजल्यावर ४०० आसन क्षमतेचे अद्ययावत सभागृह आहे. इमारतीत लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे.