नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने मांसाहार करणा-या नागरीकांचा कॉकरेल, ब्रॉयलर कोंबड्यांचे चिकन न खाता बकरी, बोकडाचे मटण खाण्याकडे कल आहे. त्यामुळे बकरी, बोकडाचे मटण विक्रेते त्याचा फायदा उठवत एका किलो मागे ६४० रुपये घेत असल्याचे दिसून येते. नवी मुंबईसह उरण, पनवेल शहर परिसरातही हेच चित्र असून ग्राहकांची नाहक आर्थिक लूट करणाऱ्या मटण विक्रेत्यांवर कारवाई करावी असा संतप्त सूर ग्राहक वर्गातून निघत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खास खबरदारी घेतली आहे. त्यानुसार मांसाहार करणाऱ्यांनी कॉकरेल, ब्रॉयलर कोंबड्यांचे चिकन अगदी गावठी कोंबड्यांचेही चिकन न खाण्याचा जणू पण केल्याचे दिसून येत आहे. चिकन खाणे धोकादायक नसल्याचे सरकारतर्फे व जाणकारांकडून सांगितले जात असतांनाही अनेक ठिकाणी नागरीक कोंबड्यांचेही चिकन न खाण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र याच खवय्यांची पसंती बोकड, बकरी मटणाकडे आहे. त्यामुळे खवय्यांची वाढती मागणी लक्षात घेत व संधी साधत नवी मुंबईसह उरण, पनवेल शहर परिसरातील मटण विक्रेत्यांनी मटणाचे भाव विनाकारण वाढवले आहेत. किमान ६४० रु. प्रतिकिलो दराने रविवारी मटण विक्री होत असल्याचे दिसून आले.
मटण विक्रेत्यांकडून खवय्यांची लूट