राज्यातील शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्या


आ.मंदा म्हात्रे यांची विधीमंडळात मागणी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - महापालिकेच्या महापे येथील शाळेत झालेल्या १४ मुलीचे विनयभंग प्रकरण तसेच मुंबई व अन्य ठिकाणच्या अशाच प्रकारच्या गंभीर घटनांची दखल घेत आ. मंदा म्हात्रे यांनी राज्यातील शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असून यावेळी सभागृहात शासनाचे या प्रकरणाकडे लक्ष वेधतानाच राज्यातील शाळांमध्ये ___सीसीटिव्ही कॅमेरा बसवावेत, अशी मागणी केल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सद्यस्थितीत मुलींच्या अत्याचारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महापेयेथील शाळेत घडलेल्या प्रकरणी संबंधीत आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. शालेय विद्यार्थिनींच्या बाबतीत असे प्रकार कुठेही अगदी बाथरुम, शिकवणी वर्गात अथवा खासगी वाहनांची ये-जा ठिकाणी होत असतात. त्यावेळी त्यांच्यावर विनयभंगासारख्या घटना घडण्याची नाकारता येत नाही. अशावेळी जर शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा लावले गेले असतील तर अशा घटनांना आळा बसू शकतो. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी महापालिका किंवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये तसेच राज्यातील सर्वच शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्याचे आदेश शासनाने द्यावेत अशी मागणी केल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले. दुर्दैव असे की सध्या भररस्त्यात, रेल्वे स्थानक,, बस स्थानक यासह वर्दळीच्या ठिकाणी मुली, महिलांचा खुलेआम विनयभंग होत असेल तर या नराधमांना पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही. त्यामुळे या संदर्भातही गृह विभागाने तातडीने पाऊल उचलून कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच सुरक्षा व न्याय विषयक कमिट्यांमध्ये महिला आमदारांचीही नियुक्ती करावी अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून केली.