नवी मुंबई (प्रतिनिधी) - सध्या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली असून सदर रोगाच्या प्रसार टाळण्यासाठी शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयात सर्व प्रकारच्या अभ्यागतांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळानेदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अभ्यागतांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिडकोच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.करोना विषाणूचा संसर्ग, प्रसार व लागण गर्दीच्या ठिकाणी जास्त होतो. सिडको महामंडळात देखील सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील अधिकारी त्याचप्रमाणे कंत्राटदार यांसारख्या अभ्यागतांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. यातून सदर विषाणूच्या संसर्ग, प्रसार व लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे सिडको प्रशासनाने सर्व प्रकारच्या अभ्यागतांना सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य सर्व कार्यालये येथे पुढील सूचनेपर्यंत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अभ्यागतांनी पुढील सूचनेपर्यंत सिडको भवन, रायगड भवन व सिडकोची अन्य कार्यालये येथे भेट देऊ नये. सदर अभ्यागतांना अतिशय तातडीचे काम असल्यास त्यांनी पत्रव्यवहार, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ईमेल अथवा मेसेजद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. करोना विषाणूची लागण ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे सिडकोतर्फे घेण्यात आलेल्या या निर्णयास सर्व अभ्यागतांनी सहकार्य असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार व लागण पार्श्वभूमीवर... सिडकोच्या कार अभ्यागतांना तात्पुरती प्रवेश बंदी!