दिशाभूल करून मुख्याध्यापक पदावर वर्णी

नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेची कारवाईची मागणी


नवी मुंबई (प्रतिनिधी)-दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करुन मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी पद स्विकारलेल्या अशोक मधुकर सोनावणे यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेतर्फे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे एका पत्राव्दारे करण्यात आली आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जुलै २००६ च्या शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र देखील न ठरलेले अशोक सोनावणे हे सन २००७ पासून नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत मुख्याध्यापक पदी कार्यरत असून त्यांनी पालिकेच्या शिक्षण विभागास दिशाभूल करणारी खोटी कागदपत्रे सादर करुन मुख्याध्यापक पद चुकीच्या मार्गाने मिळवलेले आहे असा आरोप केला आहे. सोनावणे यांची वर्ष २००७ मधील कागदपत्रांची शहनिशा न करता त्यांची थेट मुख्याध्यापक पदावर नेमणूक केल्यामुळे मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या अनेक ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. अशोक सोनावणे यांच्या संदर्भातील अनेक कागदपत्रे दि.१० फेबुवारी २०२० रोजी शिक्षण अधिकारी यांना सादर केलेली असून त्यांनी देखील सदरह प्रकरणात तथ्य असल्याचे दिसून आल्याने दि.११ फेब्रुवारी २०२० रोजी अशोक सोनावणे यांची सरळसेवेने मुख्याध्यापक पदी नियुक्ती करतांना शिक्षण उपसंचालकांची पूर्व परवानगी घेतली नसल्याचे मागासवर्ग कक्ष कोकणभवन, नवी मुंबई यांच्याकडे लेखी खुलासामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे शासन नियमांचे पालन न करता मुख्याध्यापक पदाची भरती प्रक्रिया राबवली गेल्याचे व त्यातही दिशाभूल करणारी खोटी कागदपत्रे सादर करणारे अशोक सोनावणे यांच्यामुळे मागासवर्ग कक्षाकडे इतर पदांचे बिंद नामावलीस मान्यता मिळत नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. एकंदरीत या प्रकारामुळे सर्व शिक्षकांची पदोन्नती गेली १२ वर्ष रखडली असून आजच्यामितीस या चुकीच्या नेमणूकीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या १९ शाळांवर कायम स्वरुपी नियमानुसार मुख्याध्यापक नेमले जात नाहीत. परिणामी माध्यमिक शाळांचे शैक्षणिक प्रगतीसंदर्भात प्रभारी मुख्याध्यापकांना ठोस निर्णय घेता येत नाहीत व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच मुख्याध्यापक पदासाठी पात्र असून देखील मुख्याध्यापक पदी नेमणूक होत नसल्याने शिक्षक वर्गामध्ये असंतोष वाढीस लागला असल्याची बाब विजय पाटील यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासह मधुकर सोनावणे यांच्या वागणूकीसंदर्भात अनेक प्रभारी मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या तक्रारी असन सदर तक्रारींची तसेच नेमणकीवेळी सादर केलेल्या कागदपत्राची सखोल चौकशी करुन संबंधितांविरुध्द ठोस कारवाई करावी अशी मागणी विजय बा. पाटील यांनी केली आहे.