पनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही बेकायदेशीररित्या गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका टपरी चालकावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून पनवेल शहर व परिसरात गुटखा मुक्त पनवेल करण्याच्या दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन व पनवेल महापालिकेचे सहकार्य लाभत असून संयुक्तीक कारवाईमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी पानसुपारी तसेच बंदी असलेले परदेशी बनावटीचे सिगरेटस्वर कारवाई करण्यात आली मोठ्या प्रमाणात आहे. यात काही टपऱ्या सुद्धा सिल करण्यात आल्या आहेत. असे असतानाही परप्रांतीय मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गुटखा व बंदी असलेले सिगरेटस् विकत असल्याच्या बातम्या गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना मिळत आहेत. अशाच प्रकारे शहरातील मार्केट यार्ड परिसरात पुत्तू टपरीवाला हा बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करीत असल्याची खबर मिळताच विशेष पथकाने त्या ठिकाणी जावून त्याच्यावर कारवाई केली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बेकायदेशीरित्या अशा प्रकारे गुटखा, सुगंधी मसाले, सुपारी व सिगरेटचा साठा किंवा विक्री होत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर कारवाई