भाजपात करणार प्रवेश...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - तुर्भेतील शिवसेनेचे नगरसेवक राजेश शिंदे यांनी आपला राजीनामा काल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे सादर केला. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक रामचंद्र घरत, शिवसेनेचे उप विभाग प्रमुख संजय गुप्ता, शाखा प्रमुख किशोर राठोड शाखा प्रमुख संजय गोपाळे शाखा प्रमुख सचिन वाघमारे शाखा प्रमुख राजू जवरे उपस्थित होते. त्यामुळे राजेश शिंदे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत असून त्यांच्यासमवेत शिवसेनेतील आणखी काही पदाधिकारी व शिवसैनिक भाजपवासी होण्याची चिन्हे आहेत. भाजपातील काही नगरसेवकांनी अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला.यामुळे निष्ठावंत शिवसैनिकामध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी व्यक्त होत असून तुर्भे येथील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राजेश शिंदे यांनी दिलेला राजीनामा हा त्याचाच परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. तुर्भे येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी या तीन समर्थक नगरसेवकांसह काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. कुलकर्णी हे गणेश नाईक यांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. गणेश नाईक यांनी त्यांना तीन वेळा __स्थायी समितीच्या सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. मात्र तरीही त्यांनी नाईकांची साथ सोडली. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने तुर्भे येथे शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नगरसेवक राजेश शिंदे यांनी तुर्भे विभागामध्ये शिवसेना वाढविण्याचे काम केले आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना अवघ्या ११२ मतांनी ते पराभूत झाले होते. तर शिवसेनेची दुसरी जागा केवळ २०० मतांनी हातची गेली होती. भाजपातून आलेल्या संधीसाधू नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून रेड कार्पेट टाकले जात असल्याने तुर्भे विभागातील चारही प्रभागात शिवसैनिक कमालीचे संतापले असल्याचा आरोप काल नगरसेवक राजू शिंदे यांनी करत शिवसैनिकांना डावलण्याच्या प्रकारामुळे शिवसेना सोडत असल्याचे स्पष्ट केले. राजेश शिंदे यांच्यापासून शिवसेनेच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश करण्याचा शुभारंभ झाला असून आणखी चार ते पाच सेनेचे नगरसेवक प्रवेश करणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली. राजेश शिंदेसारख्या ज्या नगरसेवकांनी जनतेची कामे केली आहेत. त्यांनाच आम्ही भाजपात प्रवेश देणार आहोत. तुर्भेतील सर्व जागा भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..