उरण (प्रतिनिधी) - जनतेतून निवडून आलेले व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेले नवीन शेवा ग्रामपंचायतीचे सरपंच निशांत घरत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता, तो काल मंजूर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व नायब तहसीलदार संदीप खोमणे आदींच्या उपस्थितीत हा अविश्वास ठराव मंजूर झाला. यामुळे निशांत घरत यांना सरपंच पदावर आता राहता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन शेवा ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य व जनतेतून निवडून आलेले सरपंच असे एकूण १० सदस्य संख्याबळ होते. सरपंच निशांत घरत यांनी गाव आघाडी करून सत्ता आणली होती. विधानसभा निवडणुकी पूर्वी भाजपात प्रवेश केला होता. या आघाडीत एकमत न राहिल्याने फूट पडत ते विरोधकांना मिळाले. त्यानंतर सरपंच _घरत यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्या ठरावावर काल नव्या कायद्यानुसार ग्रामसभेत मतदान निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व नायब तहसीलदार संदीप खोमणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्यामध्ये ८ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने तर सरपंच व एक सदस्य असे २ मते अविश्वासाच्या विरोधात पडले. त्यामुळे सरपंच निशांत घरत यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामुळे यापुढे निशांत घरत यांना सरपंच पदावर रहाता येणार नाही. दरम्यान, याबाबत सरपंच निशांत घरत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत आपण पुढील लढाई लढणार असल्याचे सांगितले.
सरपंच निशांत घरत यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर