१३० हन अधिक जणांना ४८ लाखांचा गंडा घालणारा अटकेत

नवी मुंबई (प्रतिनिधी)- बेरोजगार तरुणांना सेंट्रल कस्टम एक्साईजमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एकूण १३० ते १४० जणांकडून अंदाजे ४८ लाख रुपये उकळून फरार झालेल्या महाठगास नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पनवेल तालुक्यातील नेवाळीगाव येथून नुकतेच जेरबंद केले आहे. संतोष मारुती पाटील असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तोरायगड जिल्हयातील पेण तालुक्यातील वळवलीगाव येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर आरोपीने सेंट्रल नोकरी लावतो असे आमिष दाखवून या प्रकरणातील फिर्यादीकडून रोख रक्कम रुपये १०,५00/- व त्याचे नातेवाईक, शेजारी व मित्रमंडळी अशा एकूण १३० ते १४० व्यक्तींकडून अंदाजे ४८ लाख रुपये रोख व त्याचे बँकेच्या खात्यावर रक्कम स्विकारुन व त्यांना नोकरी लागल्याबाबतचे बनावट ॲपाईंटमेंट लेटर, सर्व्हिस बुक व मेडिकल कार्ड आदी कागदपत्रे देवून दिशाभूल करुन फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४६८ अन्वये दि.२७ नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर गेल्या ४ महिन्यांपासून सदर भामटा पसार झाला होता.मात्र आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी त्यास जेरबंद करुन कोर्टापुढे हजर केले असता, २० मार्चपर्यंत त्यास पोलिस कोठडी मंजूर झाली आहे. सदर आरोपीने खारघर, उरण व नवी मुंबई परिसरातील लोकांना सेंट्रल कस्टम एक्साईजमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एकूण ४८ लाख रुपये स्विकारुन अनेक जणांची फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले असून सदर आरोपीस अजून कोणी नोकरीसाठी पैसे दिले असल्यास अशा नागरिकांनी तक्रारीसाठी आर्थिक गुन्हेशाखा कक्ष-२ येथे संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केले आहे.