पनवेल (प्रतिनिधी) - नवीन पनवेल व पनवेलला जोडणाऱ्या पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्यावर तात्काळ विद्युत पथदिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी पनवेल महापालिकेचे प्रभाग क्र.डचे सभापती तेजस कांडपिळे यांनी कार्यकारी अभियंता इलेक्ट्रीक हाऊस सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सिडको प्राधिकरणाच्या हद्दीतील पोदी येथील नवीन बांधण्यात आलेला भुयारी मार्ग काही दिवसापूर्वी नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला असून नवीन पनवेल व पनवेलकडे ये-जाकरणाऱ्या वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पोदी भुयारी मार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली नसून रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो. या अंधाराचा फायदा घेवून या परिसरात गैरकृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन वर्दळ करताना असुरक्षितता निर्माण झालेली असून प्रवास करणाऱ्या महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नागरी प्रश्नाबाबत संबंधित खात्याने तातडीने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर विद्युत पुरवठा सेवा सुरू करावी व नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी त्यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
भुयारी मार्ग रस्त्यावर विद्युत पथदिवे लावण्याची मागणी