मुंबईत २रुग्ण व्हेंटिलेटरवर

पुढचे १० दिवस काळजीचे



मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेण्याची तसेच गर्दीची ठिकाणे टाळण्याची गरज आहे. ३१ तारखेपर्यंत म्हणजे पुढचे १० दिवस आपल्याला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. हे दहा दिवस फार महत्त्वाचे आहेत. सध्या राज्यात करोना साथीचा दुसरा टप्पा आहे. आपण तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठीच आम्ही सातत्याने आवाहन करत आहोत, असे नमूद करत कृपा करून गर्दी टाळा, अशी कळकळीची विनंतीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली. राज्यात गेल्या १२ तासांत करोनाचे४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. ४९ पैकी मुंबईमधील एका व्यक्तीचा १७ मार्चला मृत्यू झालेला आहे. करोना बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. ___ करोना साथीच्या दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाणार नाही, यासाठी प्रामुख्याने गर्दी टाळण्याची आवश्यकता आहे. कार्यालयांत ५० टक्केच कर्मचारी असावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. लोकल, बसमध्येही गर्दी कमी राहील, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. तूर्त मुंबईत लोकल वा बससेवा बंद करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, लोकांनी गर्दी टाळली नाही तर शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला लोकल व बससेवा बंद करावी लागेल. ती वेळ आमच्यावर आणू नका, असे आवाहनही टोपे यांनी केले.