कोरोना आजाराने काही कालावधीतच भारतातही दहशत माजविली असून देशातील कोरोना संक्रमित मृत्यूंची संख्या आता चार वर पोहचली आहे. अनपेक्षितपणे ओढवलेले संकट अत्यंत गंभीर स्थिती आणेल, याचा अंदाज भारतवासीयांना सुरुवातीला आला नाही. मात्र गेल्या १०-१२ दिवसांत चित्र एकदम बदलून गेले आणि गावापासून नगरांपर्यंत आणि शहर-महानगरांपासून राजधानी शहरांसह विविध शहरांमध्ये या आजाराचे संशयित आणि आजाराची लागण झालेले रुग्ण सापडू लागले. विशेषतः विदेशातून आलेल्यांना झालेल्या या कोरोना नावाच्या आजाराची दहशतच लोकांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात असे प्रत्येकी एक या प्रमाणे तीन रुग्ण दगावले आणि अनेक रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर काल गुरुवारी पंजाबच्या नवाशहर जिल्ह्यातील एका रुग्णालयात आणखी एकाचा मृत्यू झाला. ही ७२ वर्षीय व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीहून इटली व तेथून भारत असा प्रवास करत मायदेशात दाखल झाली होती. छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार काळात हा रुग्ण मरण पावला. या चौघा मृतांबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोनावर उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या व्यक्तीवर कोरोनासह अन्य विविध आजारांवर उपचार सुरू होते. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. दुर्दैव असे की, देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतही अनेक रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंत राज्यात एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र एकाच्या मृत्यूमुळे आणि आतापर्यंत एकूण ४१ जणांना राज्यात कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने भीतीचे सावट गडद होत आहे. राज्यात १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले असून बाधित भागातून एकूण ११६९ प्रवासी राज्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात भरती करण्यात आलेल्यांपैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जे रुग्ण आढळून आहेत, त्यात २६ पुरूष व १५ महिला रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारपर्यंत आणखी २ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती, यापैकी एक रुग्ण (४९ वर्ष) मुंबईचा असून हा रुग्ण ७ मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण (२६ वर्ष) हा पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती आहे. हा तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील स्थितीचे गांभीर्य पाहता नवी दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेच्या तज्ञ पथकाने नुकतेच पुणे येथे भेट देऊन येथील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यातूनही नवी माहिती उघड होईल. तथापी राज्यात कोरोना विषाणू आजाराचा प्रादूर्भाव आटोक्यात येण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवरील प्रशासन आपल्या परीने जोरदार प्रयत्न करीत आहे आणि आवश्यक त्या खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. शाळा कॉलेजना सुट्ट्या दिल्या आहेत आणि खासगी कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' कार्यपद्धती अवलंबत कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची संमती दिली आहे. हे सारे चित्र चिंतेत भर टाकणारे आणि कोरोनाचा विळखा व्यापक होत असल्याचे दर्शवणारे आहे. मात्र शासन आणि प्रशासनाकडून केले जाणारे उपाय, सूचनांचा चांगलाच परिणाम होईल, तसेच वैयक्तिक पातळीवरही नागरीक खबरदारी घेत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. या साऱ्यामुळे कोरोना विषाणूपासून होणाऱ्या आजाराला पळवून लावण्यात यश येईल आणि कोरोनाचा विळखा लवकर सुटेल, असा विश्वासही मनात बाळगूया!
विळखा लवकर सुटो!