कोरोनामुळे शाळा परिसरात शुकशुकाट


नवा मुबई (प्रातानधा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार एरवी नेहमी वर्दळ व किलबिलाट असलेला नवी मुंबईतील शाळांच्या परिसरात सोमवारी शुकशुकाट पसरला असल्याचे चित्र दिसत होते. त्यानिमित्ताने अनेकाना शाळांना सुट्या लागतात त्या दिवसांची आठवण झाली होती. दरम्यान, असे असले तरी काही ठिकाणी पालकांना या निर्णयाबाबतची माहितीच नसल्यामुळे सकाळी-सकाळी आपल्या पाल्याना घेऊन ते शाळेमध्ये दाखल झाले होते. मात्र जेव्हा त्यांना शाळांना सुट्टी असल्याचे समजले तेव्हा आल्या पावलांनी त्यांना पुन्हा आपल्या घराकडे जावे लागले होते. एक विसाव्या शतकातील आधुनिक शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व गर्दीचे स्वरूप येईल अश्या विविध कार्यक्रमांवर महापालिकेने निबंध आणले आहेत. राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, स्वीमिंग पूल आणि जिम बंद ठेवण्याचे आदेश काढले असून याठिकाणी सध्या शुकशुकाट दिसत आहे.