वाशी खाडी पुलावर दोन डंपरमध्ये अपघात; मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी


वाशी (प्रतिनिधी) - पनवेल महामार्गावर वाशी खाडी पुलावर काल सकाळच्या सुमारास दोन डंपरमध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर अपघात झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खडी माल घेऊन जाणारा डंपर पुलावर बंद पडला असता, या बंद पडलेल्या डंपरला मागून येणान्या दुसऱ्या डंपरने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येते. या अपघाती घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही अपघातग्रस्त डंपर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आले. यामुळे या मार्गावरची एकच लेन सुरू ठेवण्यात आली असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन दोन किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे सुमारे दीड ते दोन तासांहून अधिक काळ या पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने ऐन सकाळी कामावर जाणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. दरम्यान, या अपघाती घटनेत , कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.