धोकादायक व विकासकामातील झाडे तोडतांनाही... वृक्ष रक्षण, संवर्धनासाठी नवी मुंबई महापालिका सतर्क


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील धोकादायक वृक्ष व विकासकामातील वृक्ष तोडतांनाही वृक्ष रक्षण, संवर्धनाबाबत महापालिका विशेष सतर्कता दाखवत आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या कालच्या सभेत नवी मुंबईतील धोकादायक वृक्ष व विकासकामातील वृक्ष तोडणे यासाठी एकूण ६६ प्रस्ताव विभाग स्तरावरुन प्राप्त झाले होते. सदर प्रस्तावांवर वृक्ष प्राधिकरण सदस्यांसोबत प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सविस्तर चर्चा केली. मानवी जीवनात वृक्षांचे महत्वाचे स्थान असून शहराचे पर्यावरण चांगले रहावे यासाठी विकास कामांच्या नावाखाली झाडे तोडण्यास सरसकट परवानगी देणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. वृक्ष तोडण्यासंदर्भातील ६६ प्रस्तावांपैकी जास्तीत जास्त झाडे वाचवता येतील काय व त्यांचे स्थलांतर करणे शक्य आहे काय, याबाबत पाहणी करुन योग्य निर्णय घेण्यात यावा, असेही निर्देश आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिले. वृक्ष प्राधिकरणास प्राप्त प्रस्तावांमध्ये गृहनिर्माण संकुल व रो हाऊसेस यांच्या परिसरातील वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले असून यापैकी बरीचशी झाडे संरक्षक भिंती व इमारतीला धोका असल्याकारणाने तोडण्यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे. संरक्षक भिंतीस धोका निर्माण झाल्याने झाड तोडणे योग्य होणार नाही. त्यासाठी कुंपण भिंत नव्याने बांधून झाड वाचवावे असा पर्याय या बैठकीत देण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील नागरिक व सोसायटी यांनी वृक्षांची लागवड ही गटारे, पाण्याची टाकी, संरक्षण भिंती लगत, मलनि:स्सारण वाहिनी शेजारी, उच्च दाबाच्या वाहिनीखाली करू नये, जेणेकरून भविष्यात या झाडांमुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असेही मत महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले.