मुंबई (प्रतिनिधी) - सिडको संदर्भातील कॅगच्या अहवालात उल्लेखित प्रकल्प हे २०१४ पूर्वीचे आहेत. त्यामुळे केवळ 'सीलेक्टिव्ह लीकेज' का केले गेले, याचे आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतातंनाच याआधीचा 'स्वप्नपूर्ती' संदर्भातील महत्त्वाचा भाग का वगळला गेला, याचीही मला उत्कंठा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. काल सादर चा करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालानंतर विधानभवन परिसरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कॅगच्या अहवालातील अनेक तपशीलांवर आश्चर्य व्यक्त केले आहे. फडणवीस म्हणाले, 'कॅगच्या अहवालात एप्रिल २०१३ ते मार्च २०१८ पर्यंतच्या विविध कामांच्या अवलोकनाचा उल्लेख आहे. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळ याच्या निविदांबाबतच्या काही बाबी कॅगने निदर्शनास आणल्या आहेत. नवी मुंबई मेट्रो रेल आणि नेरूळउरण रेल्वे प्रकल्पासंदर्भात ज्या काही बाबी निदर्शनास आणण्यात आल्या, त्यासंदर्भातील सर्व निविदा आणि निर्णय हे २०१४ च्या पूर्वीचे आहेत. त्यासंदर्भात सुद्धा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ऑगस्ट २०१४ मधील निविदा किंवा सप्टेंबर २०१४ मध्ये अॅडव्हान्स यासंदर्भातील ते आक्षेप आहेत.' 'स्वप्नपूर्ती' या खारघरमधील स्कीमच्या वाटपात विलंबाबाबत सुद्धा आक्षेप आहे. पण, २०१३ मध्ये या स्वप्नपूर्तीसंदर्भात नॉमिनेशन पद्धतीने काम देण्यात आले आणि कुठल्याही निविदा मागविण्यात आल्या नाहीत, हा सुद्धा एक आक्षेप होता. सुमारे ४७५ कोटीचे हे काम होते. २०१७ मध्ये निविदा मागविण्यात आल्या, तेव्हा त्या २०१३ पेक्षाही कमी किंमतीत आल्या. नेमका हा भाग अहवालातन का वगळण्यात आला, याचे मला आश्चर्य वाटते. कदाचित तो पुढच्या अधिवेशनात येणार असेल. पण, आधीचा भाग न येता, पुढचा भाग आला, याची मला उत्कंठा आहे. तथापि हा अहवाल जारी करताना त्यातून केवळ निवडक भाग बाहेर देण्यात आला, हे आश्चर्यजनक आहे. पण, आता हे स्पष्ट झाले आहे की, यातील प्रकल्प हे २०१४ च्या आधीचे आहेत.
box
'सिडकोचा घोटाळा हिमनगाचे टोक' - काँग्रेसची टीका
सिडकोच्या कामांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आल्यानंतर त्यावरून आधीच्या फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'सिडकोचा घोटाळा हिमनगाचे टोक' असल्याचे नमूद करत जोरदार हल्ला चढवला आहे. सिडकोच्या कामात प्रचंड अनागोंदी व अनियमितता असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या आजच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. फडणवीस सरकारने टेंडरच्या माध्यमातून जनतेचा पैसा लुबाडला असून स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरवणान्या देवेंद्र फडणवीस सरकारचा बुरखा या अहवालामुळे टराटरा फाडलेला आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी तोफ डागली. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतर अशा मिळून २००० कोटी रुपयांच्या कामांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून घोटाळा कारण्यात आला आहे. सिडकोचे काम थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली होत असताना एवढा मोठा घोटाळा झालाच कसा आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे, तेही आता समोर आले पाहिजे. कामाचा अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला ८९० कोटींची कामे दिली गेली. सिडकोचा कंत्राटदारच सिडकोचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो, हे आम्ही सरकारला विचारले होते त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कामाच्या निविदा राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती न देता काढण्यात आल्या. तर ४३० कोटी रुपयांच्या १० कामांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. हे गंभीर असून सिडकोमधील हा घोटाळा हिमनगाचे एक टोक आहे, सावंत म्हणाले.