परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन...
उरण (प्रतिनिधी)- उरण तालुक्यातील केंद्र सरकारच्या शास्त्रागार साठा असलेल्या एनएडी करंजा प्रकल्पात कामगारांची गस्त सुरू असतांना तेथील पीआयएम जेट्टीच्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने गस्तीवरील कामगारांचे भीतीपोटी धाबे दणाणले आहे. या बिबट्याचे गस्तीवरील कामगारांना प्रत्यक्ष दर्शन झाल्याने एनएडी करंजा येथील सहाय्यक जनरल व्यवस्थापक एस.के. शर्मा यांनी तात्काळ परिपत्रक काढून या बिबट्या बाबत सर्वांनीच दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर एनएडी येथील काढण्यात आलेले परिपत्रक उरण शहरासह तालुक्यात सर्वत्र सोशल मिडियाद्वारे पोहोचले असल्याने एनएडी करंजा लगत असलेल्या मोरा कोळीवाडा, भौरा आणि बोरीसह केगाव, आवेडा येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबतच्या वृत्ताला एनएडी करंजा येथील सूत्रांकडून दुजोरा मिळाला नसला तरीही तेथील अधिकाऱ्यांनी काढलेले परिपत्रक खरे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. हिंस्त्र पशु पाहण्यात आल्या बाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एनएडी मधील पीआयएम जेट्टी परिसरात ५ मार्च _रोजी एनएडी येथील वन विभागाच्या कर्मचा-यांना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे तसेच सदर बिबट्या नजरेत पडल्यास एनएडीच्या डीएनपीएम कार्यालयास तात्काळ कळविण्यात यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी करंजा गावातील नाक्यावर एका पडीक घरात बिबट्या शिरला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागा समवेत मदतीसाठी पुढे सरसावलेल्या वन्यजीव प्रेमींना त्याने जखमी केले होते. त्यामुळे एनएडी येथील वनविभागाच्या कर्मचा-यांना नजरेस पडलेल्या बिबट्याची अधिकृत माहिती देण्यात येत नसली तरी मात्र या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.