नवी मुंबई महापालिका निवडणूक.... शेतकरी कामगार पक्ष लढवणार १११ जागा

आ.बाळाराम पाटील यांची माहिती



नवी मुंबई (प्रतिनिधी) - आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण ताकदीने उतरून मित्र पक्ष व संघटनांच्या साथीने नवी मुंबईतील सर्वच्या सर्व १११ प्रभागातील जागा लढविणार असल्याची माहिती भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते व आमदार बाळाराम पाटील यांनी वाशीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन सचिव अॅड. राजेंद्र कोरडे, शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एस.व्ही. जाधव, प्रा. सुधाकर जाधव, कांतीलाल जैन व हिरामल पगार आदी उपस्थित होते. आ.बाळाराम पाटील पुढे म्हणाले की, नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे धरण असूनही शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत, आरोग्य व्यवस्था आजारी आहे, ज्यांनी हे शहर वसवण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या त्या कुटुंबात आज फसवणुकीची भावना आहे. या नवी मुंबई शहराच्या निर्मितीत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, या शहराला वैभव व स्थानिकांना, नागरिकांना मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा पुरवून शहर सुखी व समाधानी करून देण्याच्या निर्धाराने शेका पक्ष या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरत आहोत. शहराचे बकाल स्वरूप आम्हाला पाहताना वेदना होत आहेत, बागा आहेत पण निगराणी नाही, इस्पितळे आहेत पण सोयी नाहीत, अंतर्गत रस्ते खराब आहेत, बसेस आहेत पण जनतेला हवेत तसे मार्ग नाहीत, रेल्वे स्टेशन भव्य आहेत पण स्टेशनावर, बाहेर बकालपणा तसाच शाबूत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन सचिव अॅड. राजेंद्र कोरडे यावेळेस म्हणाले की, महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास हा आमचा वादा असल्याचे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते प्रा. एस.व्ही. जाधव यांनी आपले मत मांडले. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या ३० वर्षापूर्वीच्या इमारती, मोडकळीस आल्या आहेत. या इमारतीचे पुनर्विकासाचे धोरण जाहीर होऊनही एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. या इमारतींना सी-१ कॅटेगरी लावून त्यांचे वीज-पाणी कनेक्शन तोडण्याचे कारस्थान करून या रहिवाशांना बेघर करण्याचा उद्योग जोरात सुरु असल्याची टीका त्यांनी केली.