वाशी (प्रतिनिधी) - आजारपणामुळे वाशीतील फोर्टिस हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या एका ६५ वर्षीय वृध्द गृहस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या त्याच्या मुलीने हास्पिटलमधील आयसीयु वार्डमधील स्टिलची खुर्ची ओढून आदळआपट करण्यासह काच असलेल्या दरवाजाची लाकडी फ्रेम लॉकचे नुकसान केले तसेच आयसीयु वार्ड मधील टेबलवर ठेवलेला एचपी कंपनीचा काम्प्युटर टेबलवरून खाली पाडून नुकसान करण्याचा प्रकार केला. हा गोंधळ आवाक्याबाहेर गेल्यानंतर वाशी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर याप्रकरणी हिरानंदानी हेल्थके अर प्रा. लिमिटेडच्या वाशीतील फोर्टिस हास्पिटलचे सर्वसाधारण प्रशासक प्रसाद गावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात पौर्णिमा घरत नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत गृहस्थाचे नाव बालाजी कावळ्या खराटकर (वय ६५) असे आहे. बालाजी खराटकर यांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचाराकरीता फोर्टिस हास्पिटल वाशी येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पहाटे आणले होते. त्यावेळी खराटकर याना प्रथम कज्युल्टी विभागात उपचाराकरीता दाखल करून तेथील वैदयकीय अधिकारी डॉ. शिवराम मिश्रा हे सदर आजारी इसमावर उपचार करत होते. मात्र खराटकर यांच्यावर उपचार करूनही त्यांची प्रकृती स्थिर न झाल्याने त्यांना आयसीयु वार्ड मध्ये हलविण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरु असतानाच खराटकर यांची प्रकृती अत्यंत खालावली व २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास बालाजी खराटकर यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील डॉक्टरांनी खराटकर यांचे नातेवाईक - मुलगा, मुलगी, पत्नी आदी सर्वाना दिली. त्यावेळी खराटकर यांची मुलगी पौर्णिमा हिने मोठमोठयाने आरडाओरडा करून आयसीयु वार्ड मधील स्टिलची खुर्ची ओढून आदळआपट करण्यासह काच असलेल्या दरवाजाची लाकडी फ्रेम लॉकचे नुकसान केले तसेच आयसीयु वार्डमधील टेबलवर ठेवलेला एचपी कंपनीचा काम्प्युटर टेबलवरून खाली पाडून नुकसान करण्याचा प्रकार केला असल्याचे फोर्टिस हास्पिटलचे सर्वसाधारण प्रशासक प्रसाद गावडे यांनी वाशी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर घडलेला हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदरचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याने रुग्णालयाची तोडफोड