उरण (प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी असणाऱ्या तालुक्यांना मासळीची _आवक घटल्याने मोठा परिणाम सहन करावा लागत आहे. सध्या बाजारात मासळीच कमी येत असल्याने ग्राहकांना मोठी किंमत मोजून मासळी खरेदी करावी लागत आहे. उरण, पनवेलसह नवी मुंबईत मासळी खाणाऱ्यांची संख्या मोठी असून मासळीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. तर मुंबईतून अधिक प्रमाणात मच्छी आणली जात असल्याचे नवी मुंबईतील मच्छी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. वादळी वारे नसताना सुद्धा मासळीची आवक अचानक घट ल्याने स्थानिक तसेच पर्यटकांना मोठी किंमत मोजून मासळी विकत घेताना पहावयास मिळत आहे. अचानकपणे अशी परिस्थीती उदभवल्याने ग्राहकांप्रमाणेच स्थानिक मच्छिमार सुद्धा हवालदिल झाले आहेत. पूर्वी पेक्षा दुप्पट दराने मासे खरेदी करावे लागत असल्याने स्थानिक ग्राहक मासळी बाजारात चक्कर मारून किंमतीमुळे मासे खरेदी न करता जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे चिकनच्या विक्रीतही घट आल्याचे निदर्शनास येत आहे. मासळी महाग झाल्याने सामान्य नागरिक व रायगडमधील पर्यटक त्रस्त झाले आहेत.
रायगडमध्ये मासळीची आवक घटल्याने भावात मोठी वाढ