नवी मुंबई (प्रतिनिधी) - चीनसह अनेक देशात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने याबाबत तातडीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी ८ आयसोलेशन बेङ्सचा विशेष कक्ष तयार केला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच करोना संसर्गाविषयी महापालिका क्षेत्रातील वैद्यकिय व्यावसायिक, खाजगी रुग्णालयांचे प्रमुख, हॉटेल मालक, आय.टी. कंपन्यांचे व्यवस्थापक, उद्योग समुहांचे व्यवस्थापक, स्मॉल स्केल असोसिएशन अंतर्गत उद्योजक यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. _करोना विषाणूची लागण होऊ नये तसेच त्याचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता तशा प्रकारची लक्षणे आढळल्यास आवश्यक तपासण्या करून योग्य उपचार करण्याची गरज असल्याचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या बैठकीत सांगितले. अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणेउपआयुक्त तथा शिक्षणाधिकारी नितीन काळे, परिमंडळ उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगिरे यावेळी उपस्थित होते. वैद्यकिय व्यावसायिकांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाची लक्षणे बघून, त्याची तपासणी करून त्याला योग्य मार्गदर्शन करावे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नियमितपणे हात स्वच्छ धुणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे, संशयीत रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर व संपर्कातील व्यक्तींनी एन. ९५ या विशिष्ट मास्कचा वापर करणे. स्वच्छ व पूर्ण शिजविलेले अन्न खाणे आवश्यक असल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ म्हणाले. नवी मुंबई महापालिकेमार्फत होर्डीग, पप्लेट्स, सोशल मिडीया, केबल वाहिन्या याव्दारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करतानाच शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्येही याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. निर्माण केलेल्या विशेष कक्षात महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्याबाबतही त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे त्यांनी सूचित केले. करोना विषाणूचा प्रसार श्वसनातून, अस्वच्छ हातांमुळे होत असून ताप, खोकला, श्वास घेण्यास अडथळा अशी लक्षणे आढळत असल्यास तात्काळ वैद्यकिय उपचार घ्यावेत असे स्पष्ट करण्यात आले.
BOX
साबण व पाणी वापरून किमान २० सेकंद आपले हात स्वच्छ धुवावेत, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरावा, सर्दी किंवा फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा, मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्यावीत, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा अशी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरीकांनी याबाबत सतर्क राहन गरज पडल्यास १८००२२२३०९ व १८००२२२३१० या विनामुल्य टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.