उरण (प्रतिनिधी)- मागेल त्याला वीज आणि ती देखील ८ दिवसांच्या आत असा नियम असतानाही उरणच्या पूर्व भागातील वीज ग्राहक मात्र वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे हैराण झाले आहेत. पूर्व भागातील विजेसंदर्भात विनवणी अर्ज स्वीकारणाऱ्या पाणदिवे येथील कार्यालयात तब्बल पन्नास वीज मिटरसाठीचे अर्ज आहेत. मात्र या कार्यालयाकडून आमच्याकडेवीज मीटर उपलब्ध नाहीत त्यामुळे वीज मीटर बसवणार कसे असा उलट सवाल ग्राहकांना केला जात आहे. याबाबत उरण वीज मंडलाचे प्रभारी अधिकारी गतोट गांगाशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार पाणदिवे कार्यालयाकडे वीज मीटर उपलब्ध आहेत. तरीही ते वीज मीटर बसवत नसतील तर ज्या नागरिकांनी मिटरसाठी अर्ज केले आहेत त्यांनी महावितरणकडेऑनलाईन तक्रार करावी असा सल्लाही त्यांनी दिला. वीज वितरण मंडळाच्या या टोलवाटोलवीच्या कारणामुळे नव्याने घरे बांधलेल्या अनेक ग्राहकांना मात्र वीज मिळण्यापासन वंचित राहावे लागत आहे वीज वितरण मंडळाच्या अधिकारी वर्गाचा पायपोस नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. उरणच्या पुर्व भागातील वीज वितरण कार्यालयाकडे सुमारे पन्नास नागरिकांचे वीज मीटर साठीचे अर्ज आले आहेत. या अर्जदारांनी वीज वितरणच्या पाणदिवे कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांना वीज मीटर उपलब्ध नसल्याचे आणि उरणच्या मुख्य कार्यालयाकडे विचारणा केली असता तेथे पाणदिवे कार्यालयाकडे वीज मीटर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची मधल्यामध्ये ढोलकी वाजत असल्याचे दिसून येत आहे. वीज मिटरसाठी अर्ज करून पधरा दिवस झाल्यावरही अजूनही अनेकांना विजमिटर मिळत नसल्याची उरणच्या पुर्व भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
उरणमध्ये नवीन वीज कनेक्शन देण्याबाबत वीज मंडळाची टोलवाटोलवी