माजी नगरसेवक अशोक पाटील यांची मागणी
ऐरोली (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली सेक्टर-३ येथे असणाऱ्या अग्निशमन केंद्राची दयनीय अवस्था झाल्यामुळे या अग्निशमन केंद्राचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे सदरचे ऐरोली अग्निशमन केंद्र हे तात्पुरत्या स्वरुपात ऐरोलीतील सेक्टर-१५ येथे स्थालांतरीत करण्यात आले असून येथून ऐरोली अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या हाकलला जात आहे. मात्र याठिकाणी अग्निशमन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी योग्य ती सुविधा नाही. तसेच खाडीच्या किनारी असणाऱ्या या भागामुळे येथे डासांचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याने स्थालांतरीत या अग्निशमन केंद्रात सोयी सुविधा पुरवा अशी मागणी महापालिकेच्या महिला बाल कल्याण समिती सभापती संगिता पाटील व माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी केली आहे. स्थालंतरीत करण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राची महिला बाल कल्याण समितीच्या सभापती संगिता पाटील आणि माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी पाहणी केली केली असता, अग्निशमन केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले शेड हे अपुरे असल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी योग्य _ती सुविधा नाही तसेच खाडीच्या किनारी भागात हे केंद्र सध्या असल्यामुळे वाढत्या डासांच्या प्रमाणामुळे येथील कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत लवकरच आपण मुख्य अग्निशामन अधिकारी शिरिष आरदवाड यांची भेट घेऊन स्थलांतरीत अग्निशामन केंद्राची वास्तविकता त्यांच्या निदर्शनास आणून देत तेथे निर्माण झालेल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी निवेदन देण्यात येईल असे माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी सांगितले.