रस्त्यावर थुकणाऱ्यांवर पनवेल महापालिकेने कारवाई करण्याची मागणी


पनवेल (प्रतिनिधी) - सध्या कोरोना व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. अशावेळी प्रत्येकांनी स्वतःची स्वतः काळजी घेणे गरजेचे असतानाही काही नागरिक परिस्थितीचे भान न ठेवता रस्त्यावरच बिनधास्तपणे थुकत असतात. अशा व्यक्तींवर पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करावा अशी मागणी शिवसेना पनवेल शहर महिला आघाडी संघटीका अर्चना कुळकर्णी यांनी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे अगोदरच नागरिक हवालदील झाले आहेत. याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस तसेच इतर शासकीय कार्यालये सुद्धा याबाबत जागृत झाली असून त्यांच्यामार्फत जनजागृती अभियान राबविले जात आहे व जास्तीत जास्त लोकांना स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. असे असतानाही काही व्यक्ती रस्त्यावर बिनधास्तपणे ये-जा करताना थुकत असतात तर काही जण इमारतीमधून, गॅलेरीमधून, टेरेसमधून थुकत असतात. अशा व्यक्तींविरुद्ध महापालिका प्रशासनाने धडक मोहिम राबवून त्यांच्याकडून दंडात्मक वसूली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.