नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्याच्या गादीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी आरूढ झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणेही बदलत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या काल जाहीर झालेल्या निकालावरून त्याचीच पुनरावृत्ती झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समर्थक उमेदवारांचा विजय झाला. या निवडणूकीत पक्षीय प्रचार नसला तरी बहुतांश उमेदवार पश्चिम महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी पक्षाचे समर्थक मानले जातात. नवी मुंबईतील पाच घाऊक मार्केटसाठी व हमाल मापाडी घटकांसाठी अशा सहा जागांची निवडणूक झाली. यामध्ये चौघे जण पुन्हा निवडून आले आहेत. राज्यातील ३०५ बाजार समिती व ६२५ उपमार्केटची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शनिवारी पार पडली. या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून यंदा सुमारे ९३ टक्के मतदान झाले होते. यात सहा महसूल विभागातून १२ शेतकरी प्रतिनिधी __आणि तुर्भे येथील पाच घाऊक बाजारांतून प्रत्येकी एक संचालक प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झाले होते. यात एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मुंबई बाजार क्षेत्रातील __भाजीपाल्याचे मतदारसंघातुन शंकर पिंगळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार काशिनाथ दिनकर मोरे यांना पराभवाची धूळ चारली. यात शंकर पिंगळे यांना एकूण ९९६ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काशिनाथ दिनकर मोरे यांना ५३१ मते मिळून शंकर पिंगळे यांनी काशिनाथ दिनकर मोरे यांचा ४६५ मतांनी दणदणीत पराभव केला. कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळुज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा ३२५ मतांनी पराभव केला. अशोक वाळुज याना ४३१ मते मिळाली तर सुरेश शिंदे यांना अवघी ३ मते मिळाली. मुंबई बाजार क्षेत्रातील इतर सर्व विक्रेय वस्तूंचे व्यापारी मतदार संघातून (मसाला मार्केटमधून) विजय भुता हे विजयी झाले आहेत. विजय भुता यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राणावत अशोक उमरावचंद्र यांचा अवघ्या २२ मतांनी पराभव केला. विजय भुता याना ३१४ तर राणावत अशोक उमरावचंद्र यांना २९४ मते मिळाली. तर कीर्ती राणा यांना या निवडणुकीत २१४ मते मिळून ते तिसऱ्यास्थानी राहिले.. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती विभागातून काँग्रेसचे प्रवीण देशमुख व शिवसेनेचे माधव जाधव विजयी झाले. सहा महसूल विभागापैकी पुणे महसूल विभागातून सोळसकर बाळासाहेब हनुमंतराव व धनंजय कृष्णा वाडकर निवडून आले आहेत. नागपूर महसूल विभागातून सुधीर दौलतचंद कोठारी व हुकुमचंद गिविंदराव आमधरे हे निवडून आले आहेत. औरंगाबाद महसूल विभागातून अशोक डक व ग्यानदेव शिंदे हे निवडून आले आहेत. नागपूर महसूल विभागातून गोविंद प्रभाकर पाटील व महादेव राजेंद्र पाटील हे निवडून आले आहेततर अमरावती विभागातून काँग्रेसचे प्रवीण देशमुख व शिवसेनेचे माधव जाधव विजयी झाले. राज्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची गेली दहा वर्षे निवडणूक झालेली नव्हती. त्यामुळे शासनाकडून त्यावर प्रशासक नेमून कारभार हाकला जात होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले होते. त्यानुसार सहकार विभागाच्या मार्फत ही संपुर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जात नसली तरी तुर्भे घाऊक बाजारातील पाच मार्केट व हमाल मापाडी मतदार संघ अशा एकूण सहा लोकप्रतिनिधीपैकी बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक मानले जातात.
एपीएमसी निवडणुकीत पुन्हा प्रस्थापितांचीच वर्णी