४६०० कोटी रकमेच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेची मंजूरी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी सूचविलेल्या बाबींचा विचार करून जमेच्या बाजूने वर्ष -२०२०-२१ करीता रु.४५० कोटी रक्कमेची वाढ व खर्चाच्या बाजूने रु.४५० कोटी रक्कमेची वाढ सूचित करत आरंभीची शिल्लक रु.१२१७ कोटी ७६ लक्ष ८७ हजार इतकी रक्कम जमेस धरून एकूण जमा रु.४६०० कोटी आणि एकूण खर्च रु ४५९८ कोटी व अखेरची शिल्लक रु.१ कोटी ९ लक्ष इतक्या रक्कमेचे सन २०२०-२१ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सर्वसाधारण सभेने मंजूर केल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड उपस्थित होते. अर्थसंकल्पामधील विशेष तरतुदींवर भाष्य करतांना त्यांनी नवी मुंबई हे निवासयोग्य शहरांमध्ये देशात व्दितीय क्रमांकाचे व स्वच्छ शहरांमध्ये ५ स्टार मानांकित सर्वेक्षणात नेहमीच मानांकन उंचाविणारे शहर असल्याचे सांगत शहराचा हा नावलौकीक अधिक वाढविण्यासाठी विविध प्रकल्प आगामी वर्षात राबविण्याचे महापौरांनी सूचित केले. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत मेडीक्लेमची सुविधा लागू केलेली आहे. या योजनेचा नवी मुंबईतील ४० हजार ते १ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आ.गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १ लाखापेक्षा अधिक व ४ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या साधारणत: १ लाख कुटुंबांना प्रति कुटुंब ५ लाखापर्यंतची कुटुंब आरोग्य विमा योजना (Mediclaim) लागू करण्याकरीता स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करण्यात आले असून त्यामध्ये ३० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे असेही महापौरांनी सांगितले. तसेच शिक्षण विभागांतर्गत सद्यस्थितीत सुरु असलेल्या दोन सीबीएससी शाळांना मिळणारा उत्कृष्ट प्रतिसाद पाहून नागरिकांकडून सीबीएससी बोर्ड शाळांची वाढती मागणी होत असल्याने नवी मुंबईतील आठ विभागांमध्ये नवीन सीबीएससी शाळा सुरु करण्यासाठी १० कोटी रक्कमेची वाढ करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये याकरिता कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याकरिता ३ कोटी रक्कमेची वाढ सूचविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत मोरबे धरणामुळे जलसंपन्न शहर ही नवी मुंबईची ओळख असली तरी भविष्याचा वेध घेऊन वाढती लोकसंख्या लक्षात घेता टाटा हायड्रोपॉवरचे भिवपुरी येथील पावसाळ्यामध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी उचलून घेण्यासंबंधी राज्य शासनाची मंजूरी घेणे व त्याबाबतचा आराखडा तयार करणे याकरिता २ कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला बचत गटांमार्फत बनविण्यात येत असलेल्या साहित्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता शहराच्या प्रत्येक विभागात महिला बचत गटांनी बनविलेली वस्तू विक्री केंद्र स्थापन करण्यात यावी व ती आठवड्यातील एक दिवस महिला बचत गटांना उपलब्ध करून द्यावी यादृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाहतूकीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने सस्पेंडेड मोनोरेल प्रकल्प राबविण्याकरिता नवीन लेखाशिर्ष तयार करण्यात येऊन त्यामध्ये नियोजन व आराखडा तयार करणे या बाबींकरीता रु.२ कोटी इतकी स्वतंत्र तरतूद सूचित करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठांसाठी सध्या २५ विरंगुळा केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही विरंगुळा केंद्रे नागरी क्षेत्रात असून ग्रामीण व झोपडपट्टी भागातही आगामी काळात जागा उपलब्ध करून घेऊन विरंगुळा केंद्र सुरु करण्याची संकल्पना अर्थसंकल्पात सूचित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे निराधार ज्येष्ठ नागरिकांना दर्धर आजारावरील उपचार करण्याकरीता तरतूद तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांकरिता ३ कोटी रक्कमेची नवीन लेखाशिर्षाव्दारे तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या विविध प्रांतातील नागरिक नवी मुंबईत एकोप्यानेरहात आहेत. येथे काही समाजांना एकत्र येण्यासाठी तसेच कार्यक्रम करण्यासाठी भवने आहेत, तथापि काही समाजाची भवने नाहीत. यादृष्टीने विशेष लक्ष देत सामाजिक सद्भावना वाढीस लागावी यादृष्टीने मौलाना आझाद भवन, सेवालाल महाराज भवन, गुरु गोविंदसिंग भवन, संत रोहिदास भवन, महात्मा बसवेश्वर भवन, मदर तेरेसा भवन अशा विविध भवनांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे येथील मूळ संस्कृती जपणा-या आगरी, कोळी बांधवांचे भवन परिमंडळ १ क्षेत्राप्रमाणेच परिमंडळ २ क्षेत्रातही उभे करण्याच्या दृष्टीने तरतूद करण्यात आली आहे. या आगरी कोळी समाज भवनामध्ये मूळ वेशभूषा, अवजारे, परंपरा यांचे दर्शन घडविणारी संकल्पना राबविण्याचे महापौरांनी सूचित केले. त्याचप्रमाणे शहर सुशोभिकरणात तलावांची सुधारणा, वाहतूक नियोजनासाठी नवीन पूल बांधणी कामे व भुयारी मार्ग कामे, अडथळामुक्त रस्ते व पदपथ अशा विविध प्रकारच्या कामांच्या लेखाशिर्षात वाढ सूचवित सर्वसाधारण सभेने स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ४५० कोटींची वाढ करीत रु. १ कोटी ९ लक्ष अखेरच्या शिलकीसह रु.४६०० कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासात सर्वसाधारण सभेने सूचविलेल्या बाबी उल्लेखनीय ठरतील असा विश्वास महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला.