ऐरोली (प्रतिनिधी)- ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीत कार्यालयात घुसून ऐरोलीत राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकावर त्रिकुटाने लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ऋषिकेश दंडे (३२) असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव असून ते ऐरोलीतील रहिवाशी आहेत. दंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी, नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. ऐरोलीत राहणारे ऋषिकेश दंडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे ठाण्यातील नौपाडा, भास्कर कॉलनीत सुखकर्ता इमारतीत कार्यालय आहे.मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते एकटेच आपल्या कार्यालयात बसलेले असताना अचानक तेथे आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला चढविला. तसेच धमकावत मारहाण करून त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, ऋषीके श दंडे यांनी आरडाओरडा केल्याने इमारतीचा सुरक्षारक्षक धावून आल्याने हल्लेखोरांनी हल्ला घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान, मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढत असल्याने बिल्डर लॉबीमध्ये व्यावसायिक चढाओढ वाढली आहे. त्यातूनच असे प्रकार वाढत असल्याची चर्चा रंगली आहे.
ऐरोलीतील बांधकाम व्यावसायिकावर ठाण्यात हल्ला
• Dainik Lokdrushti Team