पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर राज्य सरकारने बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असला तरी बाजारात बेधडक प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत आहे. तसेच अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर बंदी असलेल्या उत्पादनांची मोठी निर्मिती केली जात आहे. राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करून दोन वर्षांचा अवधी उलटला असला तरी आजही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतही महापालिका प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये असे आवाहन जनतेला करतांनाच कारवाईही करीत आहे. मात्र काही ठिकाणी काही लोक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. लोकांच्या मतेही प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन होत आहे, त्या बाजारात उपलब्ध आहेत, मग दकानदारही त्या खरेदी करतात आणि लोकांना देत असतात. हे वास्तव आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईत महापालिका, सिडको, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा प्राधिकरणांकडून प्लास्टिक पिशव्या व अन्य वस्तूंच्या निर्मात्यांवर, वापरकर्त्यांवर आणि विशेषत: अशा पिशव्या बाळगणारे दकानदार, साठेबाज यांच्यावर कारवाई केली जातच आहे.. गेल्या आठवड्यात एपीएमसी मार्केटमधून ५४५ किलो प्लास्टिक साठा हस्तगत करण्यात आला. प्लास्टिक आणि थर्माकोल विक्रेत्यांवर नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे वाशी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सात दकानदारांवर कारवाई करीत त्यांच्याकडील प्लास्टिक साठा हस्तगत करतांनाच ८५ हजारांचा दंडही वसूल केला. याचा अर्थ महापालिका प्रशासनाकडून प्लास्टिक बंदी बाबत ठोस उपाय केले जात असतांना आणि अगदी दंडात्मक कारवाई वगैरे केली जात असतांनाही काही विक्रेते प्रशासनाच्या संभाव्य कारवाईला घाबरत नाहीत. मात्र अशांवर कारवाई व्हायलाच हवी. विशेष म्हणजे लोकांना वाटते की बंदी आहे तर प्लास्टिक पिशव्या आदीचे उत्पादन तरी कसे होते, त्यांच्यावरच कारवाई करा.... हेही खरेच म्हणायचे. त्यानुसार कारवाई होतच असते. नुकतेच प्लास्टिकचे उत्पादन सुरू असलेल्या उल्हासनगर येथील एका कारखान्यात तेथील महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी बुधवारी छापा टाकत कारखान्यातून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा २० टन इतका साठा जप्त केला आहे. या कारवाईचे स्वागत करतांनाच त्या शहरात प्लास्टिकचे सर्रास उत्पादन सुरू असल्याचे आणि प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करून दोन वर्षांचा अवधी उलटूनही प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्यांना कायदा आणि यंत्रणेचा धाक नसल्याचेही यातून समोर येत आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक निर्मितीबाबत ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर शहर सर्वात आघाडीवर असल्याचे गेल्या काही महिन्यांत या शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा जप्त केल्याच्या कारवाईतून समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात व्यायसायिकदृष्ट्या अनेक उद्योग व्यवसाय सुरु आहेत. त्यात उल्हासनगर हे अनेक वस्तूंच्या निर्मितीत अग्रेसर असे शहर आहे आणि काही बँडेड वस्तूंच्या हुबेहूब वस्तू बनविण्यातही हे शहर प्रसिध्द आहे. याच शहरात गेल्या आठवड्यातच अंबरनाथ, उल्हासनगरच्या वेशीवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर १० टन प्लास्टिकचा साठा अंबरनाथ नगरपालिकेने जप्त केला. हा सर्व साठाही उल्हासनगर येथूनच सातारा, सांगली येथे पाठवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले होते. तोच बुधवारी उल्हासनगर कॅम्प नंबर तीन परिसरातील एका काखान्यात छुप्या पद्धतीने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांची निर्मिती केली जात होती. याबाबत माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात कारखान्यात ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचा तब्बल २० टन साठा सापडला आहे. या कारखान्यातील प्लास्टिकचा सर्व साठा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने जप्त केला असल्याची माहितीही उघड झाली आहे. प्लास्टिक निर्मिती थांबल्याशिवाय प्लास्टिकचा वापर थांबणार नाही. त्यामुळे प्लास्टिक निर्मिती थांबण्यासाठी केलेली ही कारवाई योग्यच आहे!
प्लास्टिकचा बिनधास्त वापर!