मांडवा जेट्टीजवळ बोट उलटली; ८८ प्रवासी बचावले


मुंबई (प्रतिनिधी) - अलिबागमधील मांडवा जेट्टीपासून जवळच खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली असून या बोटीतील सर्व ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. काल सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. __गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबागच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट मांडवा जेट्टीपासून जेमतेम १ किलोमीटर अंतरावर असतानाच ही भीषण दुर्घटना घडली. समुद्रातील एका खडकावर आदळून ही बोट उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. बोट उलटली तेव्हा सुदैवाने जवळच मरिन पोलिसांची गस्ती बोट जवळच होती. त्यामुळे लगेचच मदतकार्य सुरू झाले. काही वेळातच तटरक्षक दलाचे गस्तीपथकही तिथे दाखल झाले. मरिन पोलीस, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांनी युद्धपातळीवर बचावकार्य करत सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश मिळवले. बोटीत ८८ प्रवासी होते. या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. ८ प्रवाशांना तटरक्षक दलाने तर उर्वरित प्रवाशांना मरिन पोलीस आणि स्थानिक मश्चिमारांनी वाचवले.